पावसाचा पहिल्याच बॉलमध्ये सिक्सर! पुढच्या 2 दिवसात मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्ट

Heavy Rain Orange Alert:  हवामान विभागानं पुढील 2 दिवस मुंबईत पावसाचा इशारा दिलाय. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 9, 2024, 09:51 AM IST
पावसाचा पहिल्याच बॉलमध्ये सिक्सर! पुढच्या 2 दिवसात मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्ट  title=
Heavy Rain Orange Alert

Heavy Rain Orange Alert: मुंबईसह कोकण पट्ट्यातील नागरिक गेले अनेक दिवस उकाड्याने कंटाळले होते. सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान पावसाने आज दमदार एन्ट्री केली असून तो मुसळधार कोसळण्याची शक्यता आहे. पावसाची सुरुवात होताच मुंबईसह कोकण विभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईसह उपनगरात रात्री उशिरा जोरदार पाऊस झाल्याने मुंबईकरांना पावसामुळे दिलासा मिळालाय. पूर्व उपनगरात कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पावसानं हजेरी लावली तर पश्चिम उपनगरातही पाऊस कोसळला. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगावमध्ये रात्री पाऊस झाला. हवामान विभागानं पुढील 2 दिवस मुंबईत पावसाचा इशारा दिलाय.  त्यामुळे आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आलंय. 

राज्यातील अनेक भागात मुसळधार

आजपासून मंगळवारपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.. या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे याठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलीये. आजपासून कोकणासह मुंबईतत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, आणि साता-या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. रायगडमध्ये पहाटे ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या लखलखाटासह जोरदार पाऊस
झालाय...रायगडमध्ये सकाळपासून आता ढगाळ वातावरण आहे...पुढील 3 ते 4 तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय..

पहिल्याच पावसात मुंबईची लाईफलाईन कोलमडली

पहिल्याच पावसात मुंबईची लाईफलाईन कोलमडलीये..तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहे.. मध्य रेल्वेच्या कल्याणहून सीएसएमटीकडे जाणा-या लोकल सेवेला याचा विशेष फटका बसतोय.. लांब पल्ल्यांच्या गाड्याही यामुळे रखडल्यात.. मध्य रेल्वे प्रमाणेच पश्चिम रेल्वेची वाहतूकही उशीरानं सुरु आहे.. एकीकडे रेल्वे सेवा कोलमडली असताना मुंबई सकाळपासून सुरु असलेल्या पावासामुळे उपनगरांत पाणी साचण्यास सुरुवात झालीये.. मुंबईतील दहिसर भागात पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक मंदावल्याचं चित्र पहायला मिळालं.. 

सोलापूरमध्ये पावसाची दमदार हजेरी

सोलापूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. मोहोळ तालुक्यातील तुफान पाऊस बरसला. तालुक्यातील पापरी गावात अक्षरशः पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. तीन महिन्यांपासून कडक उन्हामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला होता मात्र आता पावसामुळे सर्वांनाच चांगला दिलासा मिळालाय. 

पुण्यात पाणी सुचलं

पुण्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय.. या पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागात पाणी साचलं.. लोहगाव, कलवड वस्ती येथून पाण्यात अडकलेल्या 3 व्यक्तींची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली.. शहरातील विविध भागात अजूनही पाणी साचलं असून अग्निशमन दालाकडून रेस्क्यू ऑपरेशन वेगानं सुरु आहे.. दर्यान काल पुण्यात अंगावर झाड कोसळून एका व्यक्तीच्या मृत्यू झाला... अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या विविध झाडं तसंच भिंत कोसळण्याच्या 79 घटना घडल्यात.. 

भंडाऱ्यात वाऱ्यासह पाऊस 

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वा-यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे एका कापड दुकानावरील टिनपत्रे हवेत उडाले रस्त्यावर वर्दळ नसल्याने कोणतीच हानी झाली नाही. बाजार समितीतील टिन पत्रेही उडाले. वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने बाजार समितीच्या आवारात ठेवलेली धानाची पोती भिजली. तर काही धानाच्या पोत्यावर दोन मोठी झाडं पडल्याने मोठं नुकसान झालं.