एकटक पाहाल तर जेलमध्ये जाल; कोर्टाचा महत्वाचा निर्णय

रोड रोमिओंना घडणार अद्दल 

Updated: Feb 8, 2021, 07:10 PM IST
एकटक पाहाल तर जेलमध्ये जाल; कोर्टाचा महत्वाचा निर्णय  title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : अल्पवयीन मुलींना त्रास देणाऱ्या रोड रोमिओंना अद्दल घडवणारा निकाल कोर्टाने दिला आहे. एका 13 वर्षांच्या मुलीला 37 वर्षांचा व्यक्ती छळत होता. त्याला कोर्टानं शिक्षा दिली असून अशा रोडरोमियोंना चांगलीच अद्दल घडवण्यात आली आहे. न्यायालयाने याबाबत काय निर्णय दिला ते पाहूया. 

रोड रोमिओंना अद्दल घडवणारा निकाल जाहीर झाल्यामुळे सगळ्याच स्तरावरून याचं कौतुक होत आहे. मुलींना एकटक पाहणाऱ्या रोडरोमियोंवर आता कारवाई होणार आहे. मुलीकडे एकटक पाहणा-याला रोड रोमियोंना आता  6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 

 एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला छळत असलेल्या दामोदर कन्हैय्या राबडा याला चांगलीच अद्दल घडली आहे. १३ वर्षीय मुलगी शाळेत गेली तर हा तिचा पाठलाग करायचा. तसेच ती घरासमोरील बगिच्यात सायकल चालवत असेल तर एकटक पाहत बसायचा. एकदा ती मुलगी मामाच्या घरी गेली, तर या रोमिओनं तिथंही तिची पाठ सोडली नाही.. तेव्हा मामानं आणि त्याच्या मित्रांनी दामोदरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पोलिसांनी भारतीय दंड विधान आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. 2017 सालच्या या घटनेत रीतसर खटला चालला. फिर्यादी आणि 6 साक्षीदारांनी कोर्टात दिलेल्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. मुलीला एकटक पाहिल्याबद्दल औरंगाबादचे विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी दामोदर राबडा याला 6 महिने सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 

लहान मुलींना तसेच तरुणींना अशा सडकछाप रोड रोमिओंच्या जाचाला नेहमीच तोंड द्यावं लागतं. अनेकदा मुली कुणालाही न सांगता, गुपचूप हा त्रास सहन करतात... मात्र औरंगाबाद कोर्टाच्या निकालामुळं अशा मुलींना बळ मिळणाराय... रोड रोमिओंना कायदेशीर मार्गानं धडा शिकवता येतो, हेच या निकालानं सिद्ध केलं आहे.