Major traffic jams on Mumbai - Pune Expressway and Mumbai Goa Highway : मुंबई पुणे एक्स्प्रेसने प्रवास करणार असाल तर वाहतूक कोंडीचा माहिती घेऊनच घराबाहेर पडा. अन्यथा रस्त्यामध्येच अडकून पडाल. पुण्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावरही ट्रॅफिक जाम झाले आहे. तसेच मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडीची समस्या निर्माण झाली. शाळांना सुट्टी पडली आहे. तसेच विकएंड असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहन रस्त्यावर दिसून येत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल आहे.
दरम्यान, मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे बोरघाटात वाहतुकीची कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे. वाहने अतिशय धीम्या गतीने पुढे सरकत आहेत. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात वाहनांच्या लांबचलांब रांगा दिसत होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. खंडाळा घाटात मुंबई लेनवर अधूनमधून दहा मिनिटांचा ब्लॉक घेवून पुण्याकडे जाणारी वाहने मुंबई लेनवरुन सोडण्यात येत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावरही ट्रॅफिक जाम झाले आहे. कसारा घाटाजवळ दोन ट्रकना अपघात झाला आहे. त्यामुळे मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. अवजड वाहने तसेच छोट्या गाड्यांच्याही लाबंच्या लांब रांगा लागल्या आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त ट्रक बाजुला करण्याचं काम सुरु आहे.
मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहेत. कोकणात जाणारे चाकरमानी आणि पर्यटकांची वाहने रस्त्यावर दिसत आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगाव शहर ते इंदापूरच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. तीन किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग दिसून येत आहेत. कोकणात जाणारी आणि येणारी वाहने अडकून पडली आहे. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. उन्हामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महामार्ग पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.
वीकेंडचा आनंद लुटण्यासाठी अनेक लोक शहराबाहेर जात आहेत. रविवारी आणि सोमवार अशी सलग सुट्टी असल्याने आणि त्यात वीकेंडने महामार्गावर जास्तीची वाहने दिसून येत आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बंपर-टू-बंपर वाहतूक दिसून आली. तसेच नाशिक आणि मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेय. मुंबई - गोवा महामार्गावर रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत याचीही भर पडली आहे. राज्य महामार्ग पोलिस अधिकार्यांनी सांगितले की, शुक्रवारीपासून वाहतूक करणाऱ्या वाहनांची गर्दी दिसून येत होती. आज सकाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने उतरल्याने मार्गावर वाहनांची वाहतूक कोंडी दिसून आली.