खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट; पालिका आयुक्यांनी दिले महत्त्वाचे आदेश

Pune Khadakwasla Dam: पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यासंदर्भात पालिका आयुक्तांनी काही सूचना दिल्या आहेत.   

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 4, 2024, 03:45 PM IST
 खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट; पालिका आयुक्यांनी दिले महत्त्वाचे आदेश title=
Major drop in water storage in Khadakwasla dam pune news

Pune Khadakwasla Dam: उन्हाळा सुरू झाला आहे. तापमानात वाढ झाल्याने उन्हाने काहिली झाली आहे. एकीकडे उकाडा वाढत आहे तर, पुण्यातील खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. पाणीसाठ्यात घट झाल्याने पुणे महापालिकेचे  आयुक्त राजेंद्र भोसले यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत उन्हाळ्यातील पाणीवाटपाचं नियोजन करण्यात आले. तशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्याचबरोबर, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. (Pune Water News)

कोणत्याही परिस्थितीत मेट्रो प्रकल्पासह बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करु नये, अशा स्पष्ट सूचना भोसले यांनी दिल्या आहेत. तसंच, या सूचना पाळल्या नाहीत तर बांधकामे ठप्प होतील, असा इशारादेखील दिला आहे. मात्र मैला शुद्धीकरण केंद्रातील पाणी बांधकामासाठी वापरण्यास बांधकाम व्यावसायिकांचा विरोध आहे. मात्र, असं असलं तरी पिण्याच पाणी बांधकामासाठी वापरता येणार नाही. 34 गावाच्या पाण्याच्या नियोजनाची बैठक घेण्यात आली. 

 पिण्याचे पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरण्यास नेहमीच बंदी घालण्यात आली आहे. तथापि, पिण्याच्या पाण्याचा वापर करू नका, त्याऐवजी बोअरवेल किंवा एसटीपी सारख्या पर्यायांचा वापर करा, असे पुन्हा सर्वांना बजावले आहे. शिवाय, येत्या दोन-तीन दिवसांत आम्ही सर्व नियमांचे उल्लंघन करून पिण्याचे पाणी कोण वापरत आहे हे पाहण्यासाठी सर्वेक्षण करणार आहोत. त्यात कोणी दोषी आढळल्यास पालिकेकडून संबंधितांना नोटिस पाठवण्यात येईल आणि दंड ठोठावला जाईल, असं पालिकेने म्हटलं आहे. 

दरम्यान, राज्यातील सहा विभागांमध्ये आज 36.71 टक्के पाणीसाठा आहे. 14,862 दलघमी पाणी शिल्लक आहे. नाशिक विभागात 37.54 पाणीसाठा उपलब्ध आहे तर पुणे विभागात 720 धरणांचा पाणीसाठी 35.30 टक्के इतका झाला आहे. नागपुर विभागात 48.24 टक्क्यांवर गेला असून अमरावती विभागात 48.62 टक्के पाणी शिल्लक आहे. मराठवाड्यात औरंगाबाद विभागात 920 धरणांमध्ये केवळ 18.90 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.