धुळे: शिरपूर शहराजनजीक असणाऱ्या केमिकल कंपनीत शनिवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २२ जण या स्फोटात गंभीररित्या जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, शिरपूरच्या वाघाडी गावाजवळ असणाऱ्या रुमित केमिकल कंपनीतील बॉयलर फुटून हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, आजुबाजूची खेडीही स्फोटाच्या धक्क्याने हादरली. याशिवाय, केमिकल कंपनीच्या इमारतीचा केवळ सांगाडाच उरला आहे. तर या परिसरात असणाऱ्या पत्र्याच्या झोपड्याही पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत.
सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. याशिवाय, स्फोटाची तीव्रता पाहता राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकालाही (एनडीआरएफ) घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
ही कंपनी शहरापासून दूर असल्यामुळे अनेक कामगार कंपनीच्या परिसरातच राहत होते. त्यांची कुटुंबेही याठिकाणी वास्तव्याला होती. त्यामुळे जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. हा स्फोट झाल्यानंतर मदतकार्याला सुरुवात झाली. त्यावेळी आणखी काही स्फोट होण्याची शक्यतेने मदतकार्य थांबविण्यातही आले होते. त्यामुळे जखमींवर उपचारासाठी विलंब झाला. जखमींना सध्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच प्रकृती गंभीर असलेल्यांना खासगी रुग्णालयांमध्ये हलवण्यात आल्याचेही समजते.
या घटनेनंतर या परिसरात मोठा जमाव जमला होता. यापैकी अनेकांना रसायनाच्या धुराने उलट्याही झाल्या. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून नागरिकांना हटवायला सुरुवात केली. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असली तरी केमिकल कंपनीच्या इमारतीमधील आग पूर्णपणे विझलेली नाही. तसेच याठिकाणी आणखी एक स्फोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांना काळजीपूर्वक काम करावे लागत आहे.
दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला आणि या केमिकल कंपनीचे मालक कोण आहेत, याबाबत कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. मात्र, इतक्या घातक रसायनांच्या कारखान्यात सुरक्षेची पुरेशी काळजी का घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.