पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर शरद पवार संतप्त

तुम्ही माफी मागा. अन्यथा चालते व्हा, असे त्यांनी त्या पत्रकाराला सुनावले.

Updated: Aug 31, 2019, 10:25 AM IST
पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर शरद पवार संतप्त title=

श्रीरामपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संतापाचा शुक्रवारी  श्रीरामपूरमध्ये भडका उडाला. पवारांच्या या संतापाची धग एका पत्रकाराला सहन करावी लागली. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या पार्श्वभूमीवर एका पत्रकाराने शरद पवार यांना विचारणा केली. राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडून चालले आहेत. त्यात तुमचे नातेवाईक पद्मसिंह पाटील यांचाही समावेश आहे, असा प्रश्न त्याने विचारला. 

यावर शरद पवार यांचा पारा भलताच चढला. तुम्ही माफी मागा. अन्यथा चालते व्हा, असे त्यांनी त्या पत्रकाराला सुनावले. ते स्वत:ही निघून जाण्याच्या तयारीत ते होते. मात्र नंतर राष्ट्रवादीचे अविनाश आदिक व ज्येष्ठ पत्रकारांच्या मध्यस्थीनंतर त्यावर पडदा पडला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपात जाणार?

याठिकाणी नातेवाईकांचा काय संबंध आहे? सध्या माझ्यासोबत असलेले चंद्रशेखर कदम हे भाजपचे आमदार होते.  ते माझे नातेवाईक आहेत. ते इथे आले आहेत. राजकारण आणि नाते म्हणून येथे कोणी एकत्र आले आहेत काय, असा प्रतिसवालही पवारांनी यावेळी केला. 

राजकारणातून अलिप्त व्हावेसे वाटतेय - उदयनराजे भोसले

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पक्ष सोडत नाहीत तर नेते पक्ष सोडत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीत निर्णय घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यांच्या जाण्याने कोणीही एकटे पडत नाही. सत्तेबाहेर राहाणे त्यांना अडचणीचे वाटते. भारतीय जनता पक्षाकडून त्यांचा कोणता वैयक्तिक विकास केला जाणार आहे त्याची मला कल्पना नाही, असा टोलाही पवारांनी यावेळी हाणला.