पुणे : पुण्यातील सहकार नगर परिसरात काही दिवसांपूर्वी हातात कोयते आणि तलवारी घेऊन गुन्हेगारांनी दहशत पसरवल्याची घटना घडली. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड केली होती. या घटनेला काही दिवस होतात न होतात तोच याच परिसरात आणखी एक प्रकार उघडकीस आलाय.
बुधवारी दुपारच्या सुमारास धनकवडी येथील शंकर महाराज वसाहत परिसरात ही घटना घडलीय. 19 आणि 16 वर्षीय तरुणांनी हातात धारदार शस्त्र घेऊन 'या वस्तीचा दादा मीच' म्हणत दहशत पसरवत गाड्यांची तोडफोड केली. शंकर महाराज वसाहत परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाने या प्रकरणी तक्रार दिलीय.
याप्रकरणी कृष्णा सुभाष वैराळ (वय 19, रा. दिग्विजय कॉलनी, लेन नं 4, संतोष नगर कात्रज) याच्यासह एका 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यापूर्वी एकमेकांच्या घराशेजारी राहत होते. बुधवारी दुपारच्या सुमारास आरोपीने फिर्यादीला "मला घाबरून राहायचे, मी या वस्तीचा दादा आहे, आत्ताच तुला संपवून टाकतो" असे म्हणून हातातील लोखंडी हत्याराने फिर्यादीवर वार केला.
फिर्यादीने तो वार चुकवून घरात पळ काढला. त्यानंतर आरोपीने परिसरात असणाऱ्या पाच दुचाकी आणि एक चार चाकी गाडीची तोडफोड केली. त्यानंतर हातातील हत्याराचा धाक दाखवून मोठमोठ्याने आरडाओरडा करत "मीच इथला दादा आहे" असे बोलून दहशत निर्माण केली. त्याचा हा रुद्रावतार बघून वस्तीतील नागरिक लपून बसले होते.
या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.