जावेद मुलानी, झी मीडिया, जेजूरी: आज महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri 2023) देशात तसेच महाराष्ट्रात ठिकठिकाणी शंकराच्या मंदिरात मोठी गर्दी जमलेली पाहायला मिळाली. अनेक शिवभक्त यावेळी शंकराचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक होते. यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकं शंकराचे पूजेसाठी मनोभावे गर्दी करत होते. (Mahashivratri 2023 celebration in jejuri trailok darshan marathi news)
महाशिवरात्र निमित्त अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचे लोकदैवत असणाऱ्या खंडोबा (Khandoba) देवाच्या जेजुरीगडाच्या मंदिरात आणि शिखरावर असणाऱ्या स्वर्गलोकी,भूलोकी,व पाताळलोकी (त्रैलोक्य) या शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती. आज पहाटे पासून रांगा लावून हजारो भाविकांनी देवदर्शन घेतले . जेजुरीगडावर 'येळकोट येळकोट जयमल्हार,सदानंदाचा येळकोट'चा 'हर हर महादेवा'चा जयघोषाने वातावरण मल्हारमय झाले.
जेजुरीला दक्षिणेकडील काशी मानले जाते. कैलास पर्वतानंतर (Jejruri) जेजुरी गडावर शंकर व पार्वतीचे एकत्रित स्वयंभू शिवलिंग पाहण्यास मिळते. म्हणून महाशिवरात्री यात्रेला येथे वेगळे धार्मिक महत्व आहे . जेजुरी गडाच्या मुख्य मंदिरावरील शिखरात असणारे शिवलिंग हे स्वर्गलोकी शिवलिंग मानले जाते. तर गडावरील मुख्य मंदिरातील स्वयंभू लिंग हे भूलोकी शिवलिंग आणि गाभाऱ्यातील मुख्य मंदिरा शेजारी असणाऱ्या गुप्त मंदिरातील तळ घरात असणारे शिवलिंग पातालोकी शिवलिंग (Shivling) मानले जाते. मुख्य मंदिरातील स्वयंभू शिवलिंग हे दर्शनासाठी रोज खुले असते तर मंदिराच्या शिखरावरील व मुख्य मंदिरातील तळ घरातील शिवलिंग हे केवळ वर्षातून एकदा महाशिवरात्री दिवशी दर्शनासाठी उघडले जाते. महाशिवरात्रीला जेजुरी गडावर त्रैलोक्य शिवलिंग दर्शनाची मोठी पर्वणी असल्याने हजारो भाविक हा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी करीत असतात.
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर च्या जानगीर महाराज मंदिर, नागनाथ संस्थान, बेलसरी महादेव मंदिरासह जिल्ह्यातील अनेक शिव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.आज महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासूनच शिव मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.दरम्यान आज सकाळी शिरपूर च्या जानगीर महाराज मंदिरात सिद्धेश्वराला अभिषेक करण्यात आला.या महाशिवरात्रीला शिवाच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उपवासाच्या फराळाचं वाटप करण्यात येत आहे. महाशिवरात्रीनिमित्त पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील केतकेश्वर महाराजांच्या मंदिरात महादेवाच्या पिंडीला फळाफुलांची रंगीबेरंगी आकर्षक आरास केली असून तैवत असलेल्या समईंची देखील आरास या करण्यात आली आहे. ही आरास पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी गावकऱ्यांसह भाविकांनी गर्दी केली आहे.