मुंबई : राज्यामध्ये महाशिवआघाडीचे सरकार येणार आहे आता जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी तशी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. अजून काही बारकावे शिल्लक आहेत, त्यावर चर्चा सुरु आहे. जेव्हा हे सगळं अंतिम होईल तेव्हा तिन्ही पक्षांचे नेते आपल्याला भेटतील, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. दुसरीकडे मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सहमती झाली आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी सहमती झाली असली तरी स्वत: उद्धव ठाकरेंनी याबाबत अजून होकार दिला आहे का नाही? याबाबत माहिती मिळू शकली नाही. महाविकासआघाडीची आज पत्रकार परिषद व्हायची शक्यता आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. असे असले तरीही काही मुद्द्यांवर महाशिवआघाडीच्या चर्चांचे घोडे अडले आहे.
- विधानसभा अध्यक्षपद आणि महत्त्वाच्या खात्यांच्या वाटपावरून अडलं चर्चेचं घोडं
- विधानसभा अध्यक्षपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांचा दावा
- काँग्रेसला महसूल आणि उद्योग ही दोन्ही महत्त्वाची खाती हवीत
- सत्ता वाटपात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासह इतर खाती मिळाली
- उरलेली खाती आणि पदं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपसात वाटून घ्यायची आहेत मात्र त्याबाबत दोन्ही पक्षात अद्याप एकमत नाही
महाविकासआघाडीची बैठक मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये सव्वा दोन तास चालली. शिवसेनेकडून या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आले होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल, अहमद पटेल आणि बाबा सिद्दीकी यांनी या बैठकीला हजेरी लावली होती. हा वाद मिटविण्यासाठी आज पुन्हा बैठकांच्या फैरी झडणार आहेत.
सकाळी 11 वाजता काँग्रेसची बैठक तर दुपारनंतर सर्व महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.