नागपूर : नागपूरसह विदर्भातील 11 जिल्हे आणि मध्यप्रदेशचा काही भाग मिळून स्वतंत्र विदर्भाची मागणी गेली अनेक वर्ष होत आहे. संपूर्ण महाराष्ट्र्रात 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा होत असताना विदर्भात मात्र हा दिवस स्वतंत्र विदर्भ वाद्यांकडून काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो.
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी 7 एप्रिल रोजी राजधानी दिल्लीत रणशिंग फुंकण्याचा इशारा विदर्भ आंदोलनाचे नेते ऍड. वामनराव चटप यांच्यासह युवा आघाडी विदर्भ प्रदेश समितीचे प्रमुख मुकेश मासुरकर यांनी दिला होता.
विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी, नक्षलवादाला आळा घालण्यासाठी प्रदूषण व कुपोषण संपविण्यासाठी आणि बेरोजगारांच्या रोजगारासाठी एकच उपाय म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्य स्थापन करण्याची गरज आहे, ही मागणी घेऊन जवळपास सहाशे कार्यकर्ते यांनी राजधानी दिल्लीत आंदोलन केले होते.
त्यानंतर आज 1 मे महाराष्ट्र दिनी आता विदर्भवाद्यांनी दिवसभर विविध ठिकाणी वेगळ्या विदर्भ मागणीसाठी आंदोलन केले. तसेच, विदर्भातील सर्व शासकीय कार्यालय आणि परिसरात असलेले महाराष्ट्र नाव पुसून त्यांनी विदर्भ नावाचे स्टिकर चिटकवले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीने आजचा दिवस हा विश्वासघात दिवस /काळा दिवस म्हणून पाळला. शहरातील विविध शासकीय कार्यालयाच्या बोर्ड आणि सूचना फलकावर लिहलेले महाराष्ट्र शासन हे नाव पुसून त्यांनी त्याजागी विदर्भ शासन असे स्टिकर लावले आहेत.
विदर्भवाद्यांच्या या कृतीची दखल घेत पोलिसानी आता कारवाईला सुरवात केली आहे. तसेच, खबरदारी म्हणून शासकीय कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच, विधानसभा परिसरातही मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आलाय.