अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू कडू ( Bacchu kadu ) हे आपल्या आगळ्या वेगळ्या आंदोलनाच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. राज्य मंत्री झाल्यानंतरही बच्चू कडू यांच्यातील हा वेगळेपणा आजही कायम आहे.
बच्चू कडू मंत्री झाले. कामे होत नाहीत म्हणू त्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. ते जितके आक्रमक आहेत तेवढाच त्यांच्यातील साधेपणा आजही कायम आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा अमरावतीत आला.
राज्यमंत्री कडू यांच्या शासकीय ताफ्यातील वाहन, चालक आणि इतर कर्मचारी जेवण करायला गेले. याचवेळी त्यांना अमरावती शहरातील राजापेठ परीसरात एका रुग्णालयात तपासणीसाठी जायचे होते. त्यामुळे त्यांनी जेवत असलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना त्रास न देता कार्यकर्त्याच्या गाडीत बसून रुग्णालय गाठले.
बच्चू कडू यांना वेळ लागणार होता म्हणून त्यांनी कार्यकर्त्याला जायला सांगितले. काही वेळाने बच्चू कडू यांनी रुग्णालयात तपासणी केली. पण, यावेळी जवळ ना शासकीय गाडी होती ना कार्यकर्त्याची गाडी.. यामुळे त्यांनी वेळ वाया न घालवता रोडवर थांबून थेट ऑटो रिक्षा केली.
राजापेठ ते शासकीय विश्रांमगृह असा जवळपास पाच किलोमीटरचा प्रवास त्यांनी ऑटो रीक्षाने केला. या प्रवासानंतर बच्चू कडू यांनी रिक्षा चालकला भाडे विचारले तेव्हा त्याने १२० रुपये सांगितले. मात्र, बच्चू कडू यांनी ऑटो रिक्षा चालकने वेळेत पोचविल्याबद्दल स्वखुशीने त्याला ५०० रुपये दिले.