प्रवीण तांडेकर, झी मीडिया
Cyber Crime News: सोशल मीडियाचा वापर जस जसा वाढला आहे त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. यातीलच एक म्हणजे सायबर गुन्हेगारीच्या प्रकरणे वाढली आहेत. सायबर फ्रॉडच्या मदतीने लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. गोंदियात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. एका शिक्षेकेची तब्बल 12 लाख 35 हजारांची फसवणूक करण्यात आली आहे.
गोंदियातील एका तरुण शिक्षिकेची एका तरुणासोबत फेसबुकवर मैत्री झाली होती. फेसबुकवर मैत्री करणारा ब्राझील येथील मूळचा व अमेरिकेत वास्तव्यास असल्याचे त्याने सांगितले होते. शिक्षिकेला महागडे गिफ्ट पाठविण्याचे आमिष दाखवत त्याने तिच्याकडून 12 लाख उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्या या नाटकात इतर तिघांचादेखील समावेश होता. अमेरिकेहून पाठवलेले ते गिफ्ट दिल्लीला आले आहे. आता आपल्या घरापर्यंत येण्यासाठी त्याचे पैसे भरावे लागतील, असे सांगत तब्बल १२ लाख ३५ हजार ६०० रुपये लुटल्याचा प्रकार गोरेगाव येथे घडला आहे. गोरेगाव तालुक्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचगावटोला येथे त्या शिक्षिका कार्यरत आहेत.
शिक्षिकेचे फेसबुकवर अकाउंट असून जून २०२३ मध्ये त्या शिक्षिकेची जॅक्सन जेम्स या तरुणासोबत मैत्री झाली. त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर जॅक्सन जेम्स या तरुणाने माझा वाढदिवस आहे मी तुम्हाला गिफ्ट पाठव,तो तुमचा पत्ता सांगा असे म्हणत शिक्षेकडून पत्ता मागविला व त्या पत्त्यावर गिफ्ट पाठविल्याचे नाटक केले. पहिल्यांदा शिक्षिकेकडून कस्टम क्लिअरन्स चार्जेसच्या नावावर ७५ हजार रुपये मागितले. त्यानंतर नो-ड्रग्ज सर्टिफिकेट व नो-टेररिस्ट सर्टिफिकेटकरिता ७ लाख ६० हजार रुपये पाठविण्यास सांगितले. परंतु त्यांच्याकडे पैसे कमी असल्याचे सांगत शिक्षिकेने ६ लाख ६० हजार रुपये पाठविले.
शिक्षेकेने इतके पैसे भरल्यानंतरही पुन्हा व्हॉट्सअॅपवर मॅसेज करुन तुमच्या पार्सलमध्ये अतिशय महागड्या वस्तू आहेत. त्यासाठी तुम्हाला त्या वस्तूंच्या किमतीच्या १० टक्के १५ लाख ४५ हजार रुपये इतके पैसे भरावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर शिक्षिकेने १४ जून रोजी २ लाख ३० हजार व १५ जून रोजी २ लाख ७० हजार रुपये चेकद्वारे अदनान मोहिंदर या व्यक्तीने पाठविलेल्या अकाऊंटवर पाठविले. असे एकूण १२ लाख ३५ हजार ६०० रुपये त्यांच्याकडून उकळण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या शिक्षिकेने गोरेगाव पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी भांदवीच्या कलम ४२०, ३४ सह कलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत.