विदर्भावर अवकाळीचं सावट कायम; यंदाच्या हिवाळ्याबाबत हवामान विभागाचा गंभीर इशारा

Maharashtra Weather Update : वादळ येणार. थंडी कमी होणार? हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पाहा राज्याच्या कोणत्या भागात नेमकी काय परिस्थिती... 

सायली पाटील | Updated: Dec 4, 2023, 07:17 AM IST
विदर्भावर अवकाळीचं सावट कायम; यंदाच्या हिवाळ्याबाबत हवामान विभागाचा गंभीर इशारा  title=
Maharashtra Weather Update rain prediction in vidarbha temprature hike in many districts

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातून मान्सूननं माघार घेऊन आता हिवाळ्याचेही काही महिने सरलेले असताना हा पाऊस काही पाठ सोडताना दिसत नाही आहे. मोसमी पावसाचे वारे परतले असले तरीही मागील काही महिन्यांपासून अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं सत्र सुरु झालं. त्यातच आका बंगालच्या उपसागरामध्ये मिचौंग चक्रीवादळाची निर्मिती होत असल्यांमुळं परिणामस्वरुप महाराष्ट्रातील तापमानात अनेक चढउतार होताना दिसत आहेत. हवमान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसू शकतो. तर, उत्तर महाराष्ट्रावर काळ्या ढगांचं सावट असणार आहे. मुख्यत्वे राज्यातील तापमानात यामुळं कमालीची अस्थिरता पाहता येणार आहे. 

लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे आता कुठे राज्याच्या काही भागांमध्ये हिवाळा जम धरताना दिसत होता. पण, पावसाची ये-जा सुरुच असल्यामुळं तापमानावर याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत. तिथं महाबळेश्वरमध्येही तापमानात काहीशी वाढ झाली असून, ते 15 ते 16 अंशांच्या घरात पोहोचलं आहे. दरम्यान सध्या या साऱ्यामध्ये राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांवर दाट धुक्याची चादर असल्यामुळं पहाटे आणि सकाळच्या वेळी दृश्यमानता कमी असल्याचं पाहायला मिळत आहे. 

यंदा थंडी कमीच? 

सातत्यानं परिणाम दाखवणाऱ्या अल निनोचा आशिया खंडावर सर्वाधिक वाइट परिणाम होत असून, त्याचा जास्त तडाखा भारताला बसत आहे. ज्यामुळं यंदाचं पर्जन्यमान तर प्रभावित झालं पण, आता हिवाळ्यावरही याचे नकारात्मक परिणाम होताना दिसणार आहेत. प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले. थंडीदेखील कमी राहणार आहे. भारतीय महासागरीय डी-ध्रुविता अल निनोवर फारसा परिणाम करु शकली नाही. परिणामी थंडीचं प्रमाण सरासरीइतकंच असेल असं सांगण्यात येत आहे. 

हेसुद्धा वाचा : एक अकेला 'मोदी' सब पर भारी! ब्रँड 'मोदी'ला 100 हत्तींचं बळ मिळालं

 

हवामान विभागानं देश पातळीवर वर्तवलेल्या अंदाजामध्येही बरेच चढऊतार पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये तामिळनाडूचा दक्षिण पट्टा, आंध्र प्रदेशचा अंतर्गत भाग आणि ओडिशा, छत्तीसगढचा मोठा भाग पावसानं प्रभावित होऊ शकतो. तर, उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लेड लडाख प्रांत आणि उत्तराखंडमध्ये थंडीचा कडाका वाढेल. श्रीनगरमध्ये पावसाची रिमझिम असल्यामुळं हवेत गारवा वाढणार आहे. तर, या भागांमधील पर्वतीय क्षेत्रांवर शीतलहरी कायम राहतील.