Weather Update : राज्याच्या 'या' भागांना तुफानी पावसाचा तडाखा बसणार, पुढील 24 तास महत्त्वाचे

Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा चाळीशीपार गेलेला असतानाच मागील काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामानात पुन्हा काही महत्त्वाचे बदल झाल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार सध्याच्या घडीला राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस आणि काही भागांत गारपीट सुरु असल्याची महितीही समोर आली आहे. 

सायली पाटील | Updated: May 30, 2023, 07:14 AM IST
Weather Update : राज्याच्या 'या' भागांना तुफानी पावसाचा तडाखा बसणार,  पुढील 24 तास महत्त्वाचे  title=
Maharashtra Weather Update pre monsoon rain and temprature latest update

Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा चाळीशीपार गेलेला असतानाच मागील काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामानात पुन्हा काही महत्त्वाचे बदल झाल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार सध्याच्या घडीला राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस आणि काही भागांत गारपीट सुरु असल्याची महितीही समोर आली. 

हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीत सोमवारी पुण्यातील काही भागांना पावसानं झोडपलं. तर, कुठे गारपीटही झाली. अवकाळी पावसाने नागपूर शहरातही सोमवारी जोरदार हजेरी लावली. सलग तिसऱ्या दिवशी दुपारी पावसाच्या सरी बरसल्या, ज्यामुळं सातत्यानं पुन्हा एकदा दुपारच्या तापमानात बदल झाले. ही स्थिती पाहता सध्या नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढील दोन दिवस विजेच्या कडकडाटसह वादळी वाऱ्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

हेसुद्धा वाचा : गृहनिर्माण प्रकल्पांबाबत महारेराचा सर्वात मोठा निर्णय; QR कोड बंधनकारक

फक्त नागपूर नव्हे, तर तिथे मुंबईसह कोकण पट्ट्यावरही आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यामुळं काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसतील. तर, कुठे हवेतील उकाडा अधिक तीव्र होत असल्याचं जाणवेल. पुढच्या 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागांवर पावसाळी ढगांचं सावट असेल, पण हा मान्सून नाही असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. 

मान्सूनची काय खबरबात? 

एकिकडे राज्यातील तापमानात चढऊतार होत असतानाच दुसरीकडे देशातील हवामानावर आता मान्सूनचे प्रभाव दिसण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनची एकंदर वाटचाल पाहता याच वेगानं मान्सूनचे वारे प्रवास करत राहिल्यास तो 4 जूनपर्यंत केरळात दाखल होईल. त्यानंतर काही दिवसांतच तो महाराष्ट्रातही धडक देईल. 

देशातही मोठे हवामान बदल 

महाराष्ट्रात सुरु असणारे हवामानाचे बदल पाहता देशातील परिस्थितीसुद्धा काही वेगळी नाही. राजस्थानचा उत्तर भाग, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये पुढील 24 तासांत परिस्थिती बिघडू शकते. तर, हरियाणा आणि दिल्लीमध्ये ताशी 70 किमी इतक्या प्रचंड वेगानं वारे वाहू शकतात. तर, पर्वतीय भागांमध्ये हिमवृष्टीही होऊ शकते. सध्याच्या घडीला हिमाचलच्या बहुतांश क्षेत्रांमध्ये पाऊस, गारपीट आणि हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्या पार्श्वभूमीवर या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

पर्यटनावर परिणाम 

या दिवसांमध्ये (Himachal Pradesh, Jammu Kashmir, Uttarakhand) हिमाचल, जम्मू काश्मीर, उत्तराखंड या भागांमध्ये पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढतो. पण, बदलतं हवामान पाहता पर्यटकांनीही या राज्यांना भेट देण्यापूर्वी इथल्या परिस्थितीचा आढावा घ्यावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.