Weather Forecast Today : चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर कसं असेल आजचं हवामान? 8 मे रोजी मोठ्या बदलाची अपेक्षा

Maharashtra Weather Forecast Today : पावसाचा तडाखा कायम, राज्याच्या काही भागांमध्ये तापमान वाढीस सुरुवात. पाहा सातत्यानं बदलणाऱ्या हवामानाचा अंदाज. येत्या दिवसांमध्ये कसे वाहतील वारे आणि कसं असेल पर्जन्यमान... 

सायली पाटील | Updated: May 6, 2023, 07:09 AM IST
Weather Forecast Today : चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर कसं असेल आजचं हवामान? 8 मे रोजी मोठ्या बदलाची अपेक्षा  title=
maharashtra weather todays Forecast cyclone mocha india and maharashtra Unseasonal Rain predictions latest news

Maharashtra Weather Forecast Today : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये हवामानात होणाऱ्या बदलांमुळं सर्वासामान्य नागरिकांसोबतच सर्वाधिक फटका बसला तो म्हणजे शेतकऱ्यांना. राज्याच्या अनेक भागांमध्ये सुरु असणाऱ्या अवकाळीमुळं शेतपिकांचं मोठं नुकसान झालं. अवकाळीचं हे सत्र मात्र थांबलं नाही. असं असलं तरीही राज्याच्या काही भागांत मात्र आता उष्णतेचा दाह जाणवण्यास सुरुवात झाली आहे. 

अवकाळीचा फेरा सुरुच.... 

शुक्रवारी नाशिक आणि पुण्यामध्ये अवकाळीनं हजेरी लावली. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात सुमारे दिड तास झालेल्या अवकाळीमुळं सखल भागांमध्ये पाणी साचलं. तर, काही भागांमध्ये कांदा, भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं. तिथे पुण्यात परिस्थिती बदलली नाही. जिल्ह्यातील आंबेगाव येथे असणाऱ्या पारगाव परिसराला जोरदार अवकाळी पावसाने झोडपलं. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आणि उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. 

तिथे कोकण आणि विदर्भातही काही भागांमध्ये पावसाची हजेरी असून, मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्याच्या घडीला बंगालच्या उपसागरामध्ये सध्या बऱ्याच हालचाली सुरु असल्यामुळं मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्याच्या मध्यापर्यंत पूर्व मान्सून परिस्थिती उदभवताना दिसणार आहे. पण, अद्यापही चक्रीवादळाचा मार्ग काय असेल याबाबत साशंकता असल्यामुळं सध्या किनारपट्टी राज्यांमधील यंत्रणा सज्ज आहेत. 

हेसुद्धा वाचा : म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज करताय? आधी ही बातमी वाचा... नाहीतर होईल लाखो रुपयांची फसवणूक

दरम्यान 5 मेपासून अंदमानच्या दक्षिणेकडे असणाऱ्या सागरी क्षेत्रामध्ये चक्रिवादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळं 6- 7 मे पर्यंत हे वारे पुढील दिशेनं मार्गस्थ होतील. 8 मे रोजी रात्रीच्या सुमारास हे चक्रीवादळ पूर्णपणे रौद्र रुपात येईल. पण, अद्यापही त्याची अंतिम दिशा कळू शकलेली नाही. ज्यामुळं आता ओडिशा, पश्चिम बंगाल आणि चेन्नईमध्येही यंत्रणांनी या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. 

चक्रीवादळसदृश वाऱ्यांची निर्मिती होत असल्यामुळं या भागांमध्ये जोरदार पर्जन्यमानाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार चक्रीवादळ मध्य बंगलाच्या उपसागरापासून पुढे जाईल. 10 किंवा 11 मे रोजी त्याचा मार्ग बदलेल. चक्रीवादळाचा लँडफॉल दक्षिण पूर्व बांग्लादेश किंवा म्यानमानरच्या किनाऱ्यावर असू शकतो. 

पुढील 24 तासांत कसे असतील हवामानाचे तालरंग? 

येत्या काळात उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतामध्ये सकाळच्या वेळी असणाऱ्या तापमानात काही अंशांनी वाढ होणार आहे. तर, अंदमान- निकोबार बेट समूह आणि पंजाब, ओडिशा, छत्तीसगढ भागात मात्र पावसाची हजेरी असणार आहे. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड इथंही पावसाची हजेरी असेल. तर, पर्वतीय भागांमध्ये हिमवृष्टीही होणार आहे.