Maharashtra Weather News : पश्चिम महाराष्ट्रातून अवकाळीचा जोर ओसरलेला असतानाच आता उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र आता हा पाऊस थैमान घालण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 24 तासांमध्ये विदर्भ आणि मराठवाज्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी असेल अशा शक्यतेसह या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काही दिवसांपासून अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा आणि वाऱ्यांची चक्राकार निर्माण झाल्यामुळं राज्याच्या बहुतांश भागांना अवकाळीचा तडाखा बसल्याचं पाहायला मिळालं. पण, आता मात्र केरळच्या उत्तर भागापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा विरून गेला ज्यामुळं काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरला.
अरबी समुद्राच्या ईशान्येकडे सध्या अंशत: सक्रिय वाऱ्यांची स्थिती सक्रिय असून, परिणामस्वरुप काही भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. कोकण पट्टा मात्र इथं अपवाद ठरेल.
दरम्यान, सध्या महाराष्ट्राच्या जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना इथं सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता असेल. तर, काही जिल्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. वातावरणातील या बदलामुळं मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दुपारच्या वेळी तापमानात वाढ होऊन उकाडा अधिक जाणवेल.
पुढील 24 तासांमध्ये अंदमान आणि निकोबारसह तामिळनाडूमध्ये मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसतील. तर, काही भागांना जोरदार पावसाचा तडाखा बसेल. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख, मुजफ्फराबाद आणि गिलगिट बाल्टिस्तान या भागाच्या मैदानी क्षेत्रांमध्ये मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. तर, पर्वतीय क्षेत्रांमध्ये हिमवृष्टीची शक्यता आहे.
हरियाणा, दिल्ली, पंजाब आणि उत्तराखंडसह राजस्थान, पूर्वोत्तर बि्हार आणि छत्तीसगढमध्ये सकाळच्या वेळी थंडीचा कडाका जास्त राहणार असून, धुक्याचं प्रमाणही अधिक असेल. देशाच्या उत्तरेकडे येत्या काळात थंडीचा कडाका वाढणार आहे. त्यामुळं पर्यटनाच्या हेतूनं या राज्यांना भेट देणाऱ्यांना अद्वितीय वातावरणाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळं तुम्हीही येत्या काळात हिवाळी सहलीचा बेत आखत असाल तर हवमानाचा अंदाज पाहा आणि त्यानंतरच ठिकाण निवडा.