Maharashtra Weather News : शुक्रवारपासून जोर धरलेल्या पावसानं अद्यापही उसंत घेतली नसून, आता नव्या आठवड्याची सुरुवातही या पावसाच्याच हजेरीनं होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यात सक्रिय झालेल्या मान्सूनमुळं कोकणासह घाटमाथ्यावरील परिसरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. गेल्या 48 तासांपासून अनेक भागांमध्ये पाऊस अविरत बरसत असल्यामुळं नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत तर वाढ झालीच आहे, त्याशिवाय ओढे, नाले आणि डोंगरांवरून खळाळून वाहणारे धबधबेसुद्धा प्रवाहित झाले आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरातही पावसानं अद्याप उघडीप दिली नसल्यामुळं शहरातील वातावरणात आल्हाददायक गारवा जाणवू लागला आहे. पुढील 24 तासांमध्ये कोकणातील काही दुर्गम भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणातील काही भागांमध्ये पाऊस अडचणी वाढवणार असून याच धर्तीवर काही भागांना ऑरेंज तर काही भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात अधून मधून पावसाच्या सरी पाहायला मिळत असून, रविवारच्या तुलनेत सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर कमी आहे, मात्र प्रशासनानं सतर्क राहत इथं ऑरेंज अलर्ट जारी केला असून, महाड, माणगाव, पोलादपूर तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, इथंही प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मान्सूनचा प्रभाव असणारा कमी दाबाचा पट्टा सध्या अपेक्षित रचनेच्या दक्षिणेकडे झुकला असून, राजस्थानच्या बिकानेरहून निघालेला हा पट्टा बंगालच्या उपसागराच्या पूर्वेपर्यंत प्रभाव दाखवताना दिसत आहे. त्यातच गुजरात ते केरळदरम्यानही समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, देशभरात पावसाची समाधानकारक हजेरी पाहायला मिळेल. मुंबईला पुढील 24 तासांमध्ये काही अंशी जोरदार पावसापासून मोकळीक मिळणार असली तरीही हा पाऊस उघडीप देण्याची शक्यता कमीच आहे हे लक्षात घ्यावं.
देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सध्या कमीजास्त प्रमाणात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. दक्षिणेकडे खोल समुद्रात न जाण्याचा इशारा मासेमारांना देण्यात आला आहे. तर, उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागांमध्ये सध्याच्या घडीला बरसणाऱ्या पाऊसधारांमुळं या भागांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं इथं स्थानिकांसमवेत पर्यटनाच्या हेतून आलेल्यांनाही काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.