Maharashtra Weather News : नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत थंडीनं राज्यात चांगलाच जोर धरला. पाहता पाहता अगदी मुंबई शहर आणि उपनगरापर्यंत गारठा वाढला पण, डिसेंबरच्या पहिल्याच दिवसापासून मात्र राज्यात थंडी कमी झाल्याची बाब लक्षात आली. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्येही ही स्थिती फारशी सुधारणार नसून, राज्यात एकंदरच थंडी कमी झाल्याचं चित्र आहे. तापमानाचा एकेरी आकडा असणाऱ्या भागांमध्येही सध्या पारा 12 अंशांहून अधिक असल्याचं पाहायला मिळत असून, किमान तापमानात झालेली ही वाढ लक्षात येण्याजोगी ठरत आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्य़ा आणि तामिळनाडूसह देशातील प्रामुख्यानं दक्षिण किनारपट्टी क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम करणाऱ्या 'फेंगल/ फेइंजल' या चक्रीवादळामुळे हवामान प्रणालीत हे बदल झाल्याचं सांगितलं जात आहे. चक्रीवादळामुळं तयार झालेले बाष्पयुक्त वारे सध्या थेट राज्याच्या दिशेनं येत असल्यामुळं राज्यात पावसासाठी पूरक वातावरनिर्मिती होत असून, काही क्षेत्रांमध्ये ढगाळ हवामानाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. याच कारणास्तव राज्यात तग धरलेल्या थंडीवरही परिणाम होत असून, तापमानवाढ नोंदवली जात आहे.
राज्यात पुढील काही दिवसांसाठी ही प्रणाली कायम राहणार असून, डिसेंबर 5 पर्यंत मध्यम ते हलक्या, तर काही भागांमध्ये पावसात्या अतिशय हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रावर प्रामुख्यानं हे बदल दिसणार असून, इथं कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर या भागांमध्ये पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. असं असलं तरीही उत्तर महाराष्ट्रातील गारठा मात्र कायम राहणार असून, हे क्षेत्र या बदलांच्या स्थितीत अपवाद ठरणार आहे. दरम्यान, चक्रीवादळाचा परिणाम संपुष्टात आल्यानंतर म्हणजेच साधारण 8 डिसेंबरनंतर राज्यात पुन्हा एकदा दडी मारून बसलेली थंडी जोर धरताना दिसणार आहे.
देशाच्या उत्तरेकडील राज्य आणि अतीव उत्तरेकडे असणाऱ्या बर्फाच्छादित हिमशिखरांवर पश्चिमी झंझावात सक्रीय असल्यामुळं या भागांमध्ये समाधानकारक हिमवृष्टीला सुरुवात झाली आहे. एकिकडून बाष्पयुक्त वाऱ्यांचा परिणाम राज्यातील हवामानावर होत असला तरीही उत्तरेकडून येणारे शीतप्रवाहसुद्धा तितक्याच ताकदीनं गारठा निर्माण करताना दिसत असल्यामुळं काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ही थंडी पुन्हा एकदा राज्य व्यापताना दिसेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
देशातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास, काश्मीरच्या खोऱ्यामध्ये तापमान शुन्याहून कमी झालं असून, हिमाचल प्रदेशातील अनेक भागांमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. तिथं उत्तराखंडमधील पर्वरांगांमध्येही बर्फवृष्टीसाठी पूरक वातावरण तयार होत असून, दिल्लीपर्यंत थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर थैमान घालणाऱ्या चक्रीवादळाचा प्रभाव मात्र आता कमी होत असून, या वादळाची तीव्रता कमी होत पुढं ते वाऱ्याच्या झोतात एकरुप होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.