Maharashtra Weather News : फेंगल चक्रीवादळाचा परिणाम आता पूर्णपणे विरला असून, देशभरामध्ये थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. देशातील उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय राज्यांसमवेत मैदानी क्षेत्रांमध्येही तापमानात घट नोंदवण्यात येत असून, इथून वाहणाऱ्या शीतलहरींनी देश व्यापण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रात प्रामुख्यानं उत्तरेकडील क्षेत्रामध्ये किमान तापमान आठ अंश सेल्सिअसवर पोहोचल्यामुळं इथं गारठा कमालीचा वाढल्याचं लक्षात येत आहे. तर, धुळ्यात मंगळवारी तापमानाचा आकडा 4 अंश इतक्या निच्चांकी पातळीवर आल्यानं तिथं हिमाचल प्रदेशातील शिमल्यामध्ये दिवसा जाणवणारं तापमान एकगसारखं असल्याचं आढळून आलं. दरम्यान, राज्यात असणारा हा थंडीचा कडाका पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे उत्तरेकडील राज्यांमध्ये वाढलेल्या थंडीच्याकडाक्यासमवेत महाराष्ट्राच्या थंडीवर थेट पाकिस्तानहून वाहत येणाऱ्या वाऱ्यांचाही परिणाम पाहायला मिळत आहे. पाकिस्तानातून जमिनीलगत वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळं राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढताना दिसत आहे.
राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाचा पारा 3 ते 4 अंशांनी घटला असून उत्तर महाराष्ट्र वगळता सध्या महाराष्ट्रातील पहाटेचं किमान आणि दुपारचं कमाल तापमान सरासरीच्या आकडेवारीनजीकच पाहायला मिळत आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये शीतलहरीचा प्रकोप कायम आहे. मंगळवारी रात्रीच्या वेळेस शहरात 5.8°c तापमानाची नोंद झालेली आहे. काल हे तापमान चार अंशापर्यंत खाली आलं होतं. थंडगार बोचऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा प्रकोप अधिकच जाणवत आहे. अशाही थंडीमध्ये शरीराची काळजी घेणारे नागरिक घराबाहेर पडून व्यायामाला प्राधान्य देत आहेत, तर अनेक नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. येणारे काही दिवस शीतलहरीचा प्रकोप असाच कायम राहील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आणि लहान बाळांची काळजी घ्यावी असा अहवाल तज्ज्ञांनी केल आहे
देशातील उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढत असून, पश्चिमी झंझावातामुळं ही थंडी आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवत 18 डिसेंबरपर्यंत हे चित्र बदलणार नसल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. परिणामी पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान नऊ अंशांच्या खाली येण्याचा अंदाज असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
मुंबईत निच्चांकी तापमानाची नोंद झाल्यानंतर आता किमान तापमानात पुन्हा एकदा वाढ होत असून, हा आकडा पुढील तीन ते चार दिवस वाढलेलाय असून, साधारण 18 ते 20 अंशांदरम्यान हा आडका राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होत असल्यामुळं या कारणास्तव मुंबईत तापमानवाढ होताना दिसत आहे.