Maharashtra Weather : साधारण महिन्याभरानंतर मान्सूनच्या (Monsoon 2023) प्रवासासाठी पूरक परिस्थिती निर्माण होईल. असं असलं तरीही राज्यातून अद्यापही अवकाळीनं मात्र काढला पाय घेतलेला नाही. ऐन एप्रिल महिन्यातही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसानं झोडपणं सुरुच ठेवलं आहे. त्यातच कुठे उष्णतेची लाट येत असल्यामुळं नागरिक हैराण झाले आहेत.
22 एप्रिलपर्यंत म्हणजेच शनिवारी राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता असून येत्या 48 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात (Rain Predictions) पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. असं असलं तरीही कोकणच्या उत्तरेकडे असणाऱ्या भागाला उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.
(Konkan, Mumbai, Navi Mumbai) कोकणासह मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे भागात तापमानाचा आकडा वाढलेला पाहायला मिळेल. किनारपट्टी भागातील तापमान 37 अंश किंवा त्यापेक्षाही अधिक असू शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
नागपुरातील काही भागांमध्ये गुरुवारी विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. यामुळं काही भागांचा वीज पुरवठाही खंडित झाला होता. नागपुरातच नरखेड तालुक्यात गापीट झाल्याची माहिती समोर आली. मुक्तापुर पेठ , वडा उमरी, खैरगाव , मदना , जलालखेडा , खडकी, देवग्राम मध्ये झालेल्या या गारपीटीमुळं संत्र आणि मोसंबी या फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
भंडारा, सांगलीतील मिरज भाग आणि अगदी पुण्यातही या पावसानं हजेरी लावली. सिंहगड रोड, कोथरूड, वारजे परिसरात गारपीट झाल्यामुळं नागरिकांचे हाल झाल्याचं पाहायला मिळालं.
अद्याप मे महिना सुरु झाला नसला तरीही आतापासूनच विदर्भाचा बहुतांश भाग मात्र उष्णतेत होरपळून निघताना दिसत आहे. तर तिथे सोलापूर जिल्ह्यातही तापमानाचा उच्चांक नोंदवला जात आहे. गुरुवारी सोलापुरात 42.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मालेगाव आणि साताऱ्यातही परिस्थिती वेगळी नाही. साताऱ्यातही पारा 40 अंशांपर्यंत पोहोचल्यामुळं पावसानंतर सुरु झालेल्या या उकाड्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत.
पुढील 24 तासांत कसं असेल देशातील हवामान?
Skymet च्या अंदाजानुसार देशातील हवामानातही मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळेल. पुढीस 24 तासांमध्ये नागालँड, मेघालय, पंजाबचा उत्तर भाग, सिक्कीम आणि आसाम येथे मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर, लडाख, जम्मू काश्मीर, उत्तराखंड (Ladakh, Jammu kashmir, uttarakhand) भागातही पावसाच्या हलक्या सरी बरसतील. तर, पर्वतीय भागांमध्ये मात्र हिमवृष्टी होऊ शकते असा अंदाज हवमान खात्यानं वर्तवला आहे.