Maharashtra Weather News: गेल्या काही दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचं (Unseasonal Rain) संकट कोसळलंय. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर ठाणे पालघर रायगडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. अशातच शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून येतंय. कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करायचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
गोंदिया (Gondiya News) जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातलंय. मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसतोय. ऐन उन्हाळ्यात पाऊस होत असल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळालाय.
वर्ध्याच्या (Wardha News) हिंगणघाटमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातला शेतमाल भिजलाय..शेतमालाचे काही ढिगारे प्रशासनाने बाजार समितीच्या आवारातच ठेवले होते. त्यामुळे मोठं नुकसान झालंय.
वाशिममध्ये (Washim News) गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला..कारंजा तालुक्यात वादळी वा-यासह अवकाळी पाऊस बरसला. तर मालेगावसह मंगरुळपीर तालुक्यातील काही गावांमध्ये गारांचा पाऊस पडला. या गारपिटीनं पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झालेत. मानोरा तालुक्यात इंझोरी परिसरात नदी, नाले वाहत आहेत दुथडी भरून वाहतायेत.
अकोला (Akola News) जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटचा तडाखा बसतोय...अकोट, बार्शीटाकळी आणि पातूर तालुक्यात 2 हजार 200 हेक्टर शेतीचं नुकसान झालय.... वादळामुळे 42 घरांची पडझड झालीये. आणि 3 जनावरांचा मृत्यू झालाय..
हिंगोली (Hingoli News) जिल्ह्यात सायंकाळच्या वेळी पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील विविध भागात जोरदार गारपीट झाली. सतत गारपीट होत असल्याने शेतकरी चिंतातुर आहेत. हळद, आंबा, कापूस,भाजीपाला पीकांचं अतोनात नुकसान होत आहे.
परभणी (Parbhani News) जिल्ह्यात पुन्हा वादळी वा-यांसह पाऊस झाला. तसंच शहरात सुमारे 15 मिनिटं गारपीटही झाली. जिल्ह्यातील विविध भागांत बरसलेल्या या अवकाळी पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं.
यवतमाळमध्ये (Yavatmal News) धुंवाधार पावसासह तुफान गारपिटीने नागरिकांची त्रेधातिरपिट उडवली. दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक भागांत तुफान गारा बरसल्या. त्यामुळे पिकं आणि घरांचंही प्रचंड नुकसान झालं. भर उन्हाळ्यात नदी-नालेदेखील ओसंडून वाहू लागले. तर सखल भागांसह अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले.
नांदेड (Nanded News) जिल्ह्याला पुन्हा वादळी वा-यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. बिलोली तालुक्यात वादळी वारे आणि अवकाळी पावसानं थैमान घातलं..काही घरांचे पत्रे उडाले, तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. तुफान वादळी वा-यामुळे आंबा आणि चिकूची अनेक झाडं उन्मळून पडली.
आणखी वाचा - Maharashtra Day: 'चला शपथ घेऊया...', महाराष्ट्र दिनानिमित्त अजित पवार यांची खास पोस्ट!
लातूर (Latur News) जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झालंय. औसा तालुक्यातील किल्लारीमध्ये दीड एकर शेतातील शेवग्याच्या झाडांचे मोठे नुकसान झालंय. 60 ते 70 झाडं आडवी पडली. त्यामुळे शेतक-यांना आर्थिक फटका बसलाय.
नाशिकच्या (Nashik News) कळवण तालुक्यातील आभोणा, नांदुरी, कनाशी, चणकापूर परिसराला पुन्हा एकदा वादळी पावसानं झोडपलं. शेतात काढून ठेवलेला कांदा भिजलाय, तर काढणीला आलेल्या कांदा पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शिवाय आंबा,टोमॅटो, मिरची पिकांना, अवकाळी पावसाचा फटका बसलाय.