Monsoon Updates : अर्रsss; मान्सूनचा मुहूर्त हुकला; कोकणाला चक्रीवादळाचा धोका?

Maharashtra Weather Forecast : राज्यात सकाळच्या वेळा वाढणारं तापमान दुपारपर्यंत कमी होण्याचं नाव घेत नाहीये. ज्यामुळं नागरिक हैराण झाले असून, आतातरी या पावसाचं आगमन व्हावं अशीच इच्छा प्रत्येकजण व्यक्त करत आहे.   

सायली पाटील | Updated: Jun 6, 2023, 07:14 AM IST
Monsoon Updates : अर्रsss; मान्सूनचा मुहूर्त हुकला; कोकणाला चक्रीवादळाचा धोका?  title=
Maharashtra weather forecast monsoon delayed predictions latest update weekend

Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी आता अवघे काहीच दिवस उरले असं तुम्हाला वाटत असेल, तर तसं नाहीये. कारण, अद्याप तो केरळातच दाखल झालेला नाही. थोडक्यात मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्त हुकला आहे. त्यामुळं आता आणखी तो राज्यात नेमका केव्हा येणार हाच प्रश्न पुन्हा नव्यानं उपस्थित केला जात आहे. (Maharashtra weather forecast monsoon delayed predictions latest update weekend)

दरम्यान, मागील काही दिवसांपासून अरबी समुद्र आणि नजीकच्या भागामध्ये निर्माण होणाऱ्या वाऱ्यांचं रुपांतर चक्रीवादळामध्ये होणार असल्याच्या बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या. अद्यापही भारतीय हवामान खात्याकडून याबाबतचा कोणताही इशारा देण्यात आला नसला तरीही वाऱ्यांची स्थिती आणि त्यांच्या प्रवासाचा एकंदर वेग पाहता किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

मान्सूनची वाट कोणी अडवली ? 

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आग्नेय अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. ज्यामुळं या वादळाच्या प्रभावाखाली दक्षिणपूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्रही तयार झालं आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा जोर आता वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.  दरम्यान, सध्या राज्यात सुरु असणारा पाऊस हा मान्सून नसल्याची बबा नागरिकांनी लक्षात घ्यावी. 

हेसुद्धा वाचा : वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली; चर्चगेट AC लोकल दरवाजे उघडे ठेवून चालवली

राज्यात पुढील 2 ते 3 दिवसांत पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाटही येण्याची शक्यता आहे.

मान्सूनचा नवा मुहूर्त कळणार कसा? 

सुरुवातीपासूनच मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग चांगला असल्यामुळे तो 4 जूनपर्यंत केरळात येईल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. केरळातील मान्सूनच्या आगमनाची नोंद तिथल्या 14 केंद्रांवरील पावसावर अवलंबून असते. तेव्हा आता तिथं समाधानकारक पाऊस झाल्यानंतर मान्सून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात येणार असं म्हणावं लागेल. 

सध्या या वाऱ्यांचा वेग पाहता मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्याअखेरीस केरळात तर, 14 जूनला महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. पुढील आठवडाभरामध्ये म्हणजेच 16 ते 22 जूनदरम्यान राज्याचा बहुतांश भाग व्यापण्याची शक्यता आहे. मान्सून येण्याआधी मात्र तापमानवाढ होणार असून, उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळं काळजी घ्या!!!