गणेशोत्सवानंतर निवडणुकीचं बिगुल वाजणार? 20 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागणार?

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकांचे... महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी लागणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे..

वनिता कांबळे | Updated: Aug 4, 2024, 10:49 PM IST
गणेशोत्सवानंतर निवडणुकीचं बिगुल वाजणार? 20 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागणार? title=

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडतायत.. राजकीय वातावरण दिवसेंदिवस आणखीनच तापत चाललंय.... आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत..गणेशोत्सवानंतर निवडणुकीचं बिगुल वाजणार असल्याची चर्चा आहे.  20 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागण्याचीही शक्यता आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत मोठं विधान केले आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीआधी सर्वच राजकीय पक्ष अॅक्शन मोडवर आले आहेत.. सरकार तसंच विरोधी पक्षही कामाला लागले आहेत... महायुती सरकारची लगबग सुरु झालीय.. तर महाविकास आघाडीमध्ये खलबतं सुरु आहेत.. त्यातच आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलंय... 

20 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे.. हा अंदाज महायुती सरकारच्या मंत्र्यांनीच बोलून दाखवलाय.. गणेशोत्सवानंतर आचारसंहिता कधी लागणार याची तारीख सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत... 

आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम

आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारला कुठल्याही सरकारी घोषणा, नवीन योजना सुरु करता येत नाहीत.  शीलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत. सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई आहे. कुठल्याही पक्षाला प्रचारसभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी गरजेची असते.  कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जात, पंथ याआधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाही.  जातीधर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे.  प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई असते. 

7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची सुरुवात होतेय तर 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच म्हणजे 20 सप्टेंबरपासूनच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार अशी शक्यता चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलीय.