आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा धो-धो पाऊस आणि डोळ्यात पाणी! खेड्यापाड्यातील नाही तर आपल्या पुण्यातील भयानक परिस्थिती

Pune Rain: पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आलेत. लष्कराला पाचारण करून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. पुण्यात पावसानं कशी दाणादाण उडवलीय,

वनिता कांबळे | Updated: Aug 4, 2024, 09:56 PM IST
आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा धो-धो पाऊस आणि डोळ्यात पाणी! खेड्यापाड्यातील नाही तर आपल्या पुण्यातील भयानक परिस्थिती title=

Pune Heavy Rain: मुसळधार पावसाची संततधार. आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा धो-धो पाऊस. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं झालेला महाआक्रोश....पुन्हा एकदा मुसळधार पावसानं पुणेकरांच्या डोळ्यांत अश्रू तरळले...काही दिवसांपूर्वी झालेल्या महाभयंकर पुरातून सावरत असतानाच पुणेकरांना पुन्हा एकदा मुसळधार पावसानं जोरदार तडाखा दिला. एकतानगर भागात पुराचं पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. मुळा नदीचं पाणी वाढायला सुरुवात झाल्यानं एकता नगरमधील सोसायट्यांच्या रस्त्यांवर पाणी आलं होतं.

खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आला. त्यामुळं संपूर्ण पुणे पाण्याखाली गेल्याचं भयावह चित्र पाहायला मिळालं. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला. एकतानगर परिसरात पुन्हा एकदा पाणी साचल्यानं नागरिकांनी एकच आक्रोश केला.

प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्यात...तसंच खबरदारी म्हणून प्रशासनाकडून जागोजागी सुरक्षाजवान तैनात करण्यात आले होते. खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्यानं लष्कराला पाचारण करण्यात आलं होतं. लष्कराच्या 2 टीम एकता नगर परिसरात तैनात करण्यात आल्या होत्या. पाणी सोडण्याआधी सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. लष्करासह अग्निशमन दलही अलर्ट मोडवर पाहायला मिळालं.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील पूरस्थितीवर चिंता व्यक्त केलेल्या राज ठाकरेंनी पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला...खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानं एकतानगर भागातपुराचं पाणी शिरलंय.. यावेळी राज ठाकरेंनी पूरग्रस्तांशी संवाद साधला.. आणि पूरग्रस्तांच्या अडचणी समजून घेतल्या..

पुण्यातील पूरस्थितीनंतर सरकार अलर्ट मोडवर आल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूररेषेच्या आतील नागिरकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याचे आदेश दिलेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याआधीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी खबरदारी घेतलीय. दुसरीकडे बारामती दौ-यावर असलेल्या अजितदादांनी दुरध्वनीवरून अधिका-यांकडून माहिती घेतलीय. नागरिकांना सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना द्या, असंही अजितदादांनी अधिका-यांना सांगितल्याची माहिती आहे...

पुण्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार पाहायला मिळाली..मावळ उजनी खंडाळा परिसरात 226 मिलिमीटर पाऊस पडला.  मुळशी मधील धावडी कॅम्प भागात 218 मिलिमीटर पाऊस झाला.  भीमाशंकर परिसरात 166 मिलिमीटर इतका पाऊस झाला. वेल्हा पानशेत मध्ये 112 मिलिमीटर पाूस पडला.  भोर मधील भुतुंडे गावात 159 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली. 

मुसळधार पाऊस तसंच खडकवासला धरणातून होणारा विसर्ग.. यामुळे नदीकाठच्या गावांना तसंच सोसायटींना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागानं दिलाय. मात्र यंदा वारंवार पुण्याला पुराचा फटका बसत असल्यानं चिंतेचे ढग दाटून आलेत.