मोदींची महाराजांशी तुलना : उदयनराजे संतापले, बुद्धी गहाण ठेवली आहे काय?

'छत्रपती शिवाजी महाराज हे युग पुरुष आहेत. असा युग पुरुष एकदाच जन्माला येतो. उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. त्यांची उंची कोणीही करु शकत नाही.'

Updated: Jan 14, 2020, 03:22 PM IST
मोदींची महाराजांशी तुलना : उदयनराजे संतापले, बुद्धी गहाण ठेवली आहे काय?  title=

पुणे : वाईट वाटते. बुद्धी गहाण ठेवली आहे का काय? कोण तो गोयल? छत्रपती शिवाजी महाराज हे युग पुरुष आहेत. असा युग पुरुष एकदाच जन्माला येतो. उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. त्यांची उंची कोणीही करु शकत नाही. कोणाशीही महाराजांची तुलना होऊ शकत नाही. ३५० वर्षानंतरही त्यांचे नाव घेतले जाते. त्यांचे नाव घेतल्यानंतर आपण नतमस्तक होतो. अशा व्यक्तीमत्वाशी कोणाचीही तुलनाच होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्यावरुन भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय, असा प्रश्न पडतो असे यावेळी उदयनराजे यांनी म्हटले.

 प्रत्येकाला वाईट वाटले?

मी पुस्तक वाचलेले नाही. मात्र, जे पुस्तकाबद्दल ऐकायला येत आहे त्याबद्दल वाईट वाटले. महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटले. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही. एक युगपुरुष जन्माला येतो, ते आमचे शिवाजी महाराज. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो, असे यावेळी उदयनराजे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली.

'महाराजांच्या उंचीचा कोणीच नाही'

मी राजकारण करणार नाही. शिवाजी महाराज जगातील आदर्श पण त्यांची तुलना केली जाते त्याच वाईट वाटतं. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का असा प्रश्न पडतो. या जगात महाराजांच्या उंचीचा कोणीच नाही, शिवाजी महाराज युगपुरुष होते. जाणता राजा ही उपमा कुणालातरी दिली जाते, त्याचाही मी निषेध करतो. कुठल्याच देशात त्या त्या देशातील योद्ध्यांची प्रतिमा धार्मिक स्थळी ठेवत नाहीत, मात्र शिवाजी महाराजांची ठेवली जाते हे त्यांचं मोठेपण. तुलना होऊच शकत नाही, पण आपण त्यांचं अनुकरण करू शकतो, त्यांच्यासारख होण्याचा प्रयत्न करू शकतो. लुडबुड करणाऱ्याचे मी नाव घेणार नाही. त्या घराण्यात माझा जन्म झाला. याचा मला अभिमान आहे, ते मी माझे सौभाग्य समजतो. मी वंशज म्हणून नावाचा दुरुपयोग केला नाही, मिरवलो नाही, असे उदयनराजे म्हणालेत.

शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारले होते?

शिवसेना नाव दिले तेव्हा वंशजांना विचारले होते का, असा प्रश्न यावेळी उदयनराजे यांनी विचारला. महाशिवआघाडी असं नाव दिले तेव्हाही विचारले होते का ? सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे विसर पडणे हीच यांची लायकी अशा शब्दांत उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका केली. शिववडा असं नाव ठेवता तेव्हा आदर कुठे जातो. वडापावला महाराजांचं नाव कसं काय दिलं जाऊ शकतं अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.

कोणीतरी बिन पट्ट्याच रस्त्यावर फिरणारं...

कुणीतरी बिन पट्ट्याच रस्त्यावर फिरणारं व असं लिहितो, त्याची लायकी मी दाखवून देणार आहे. कुणीतरी म्हणतो वंशजांना विचारा, शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारायला आला होता का? महाशिवआघाडीतून शिव का काढलं? सोयीप्रमाणे नावाचा वापर करायचा ही कुठली पद्धत? शिवसेना या नावावर आम्ही कधी हरकत घेतली नाही. विचारांचा वारसा सगळ्यां ना लाभलेला आहे, महाराजांनी कधी जातीभेद केला नाही. दादरच्या शिवसेना भावनवरील चित्र बघा, महाराज कुठे पाहिजे होते, वंशज म्हणून आम्ही सत्तेच्या मागे कुत्र्यासारखे फिरलो नाही. खासदारकी बिसदार की सोडा, मी मनाला पटलं ते करतो. टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवा तुमची वेळ संपत आलाय.

'महाराज हे रयतेचे राजे होते'

सतेस्थानी ते सो कोल्ड जाणता राजा आहे ना, मग आरक्षणाचा विषय का पेंडींग आहे. शेतकरी मारायला लागले आणि ह्यांची हॉटेलमधून पळवापळवी, ह्यांना जनतेच काही पडलेलं नाही, म्हणे जाणते राजे. शिवसेना नाव काढून टाका ना, बघू काय होत ते, या महाराष्ट्र भूमीतील किती लोक तुमच्याबरोबर राहतात बघू. जातीय दंगली घडवून आणल्या, श्रीकृष्ण आयोगाने म्हटलंय. ते मूर्ख आहेत का? शिवजयंतीची १९ फेब्रुवारी तारीख ठरवली, तरीही तीन शिवजयंती. आणखी किती मानहानी करणार ?  अरबी समुद्रातील स्मारकराच काय झालं, मागेच व्हायला पाहिजे होते. हे लोक स्वार्थासाठी एकत्र येतात, स्वार्थ साधला की वेगळे होतात  महाराज भोसलेंचे राजे नव्हते, तर रयतेचे राजे होते, असे सांगितले.