ST Bus Strike : आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्याला ह्रदयविकाराचा झटका

20 दिवसांनंतरही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे

Updated: Nov 30, 2021, 06:06 PM IST
ST Bus Strike : आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्याला ह्रदयविकाराचा झटका  title=

पुणे : एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन (ST employees Strike) 20 दिवसांनंतरही सुरुच आहे. एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार कधी असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. 

त्यातच आता आंदोलनाला बसलेल्या एका कर्मचाऱ्याला हृद्यविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर स्थानकात आंदोलनाला बसलेल्या वाहकाला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना एसटी महामंडळाकडून निलंबनाची नोटीस पोस्टाने पाठवण्यात आली होती.

मारुती घडसिंग असं या वाहकाचं नाव असून सेवा समाप्तीचं पत्र मिळाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून धानोरी परिसरामधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गेल्या 20 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून अद्याप त्यावर ठोस असा तोडगा निघाला नाही.

एसटी महामंडळाची कारवाई
राज्य सरकार आणि एसटी महामंडळाने 41 टक्क्यांची पगारवाढ दिल्यानंतर काही ठिकाणी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात निलंबित झालेल्या सुमारे 3 हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळ बडतर्फीची नोटीस बजावणार असल्याची माहिती मिळतेय. 

निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी महामंडळाने 14 दिवसाची मुदत दिली होती. या मुदतीमध्ये काही कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. तर काही कर्मचाऱ्यांनी या नोटीस इकडे दुर्लक्ष केलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी आपलं म्हणणं मांडलं नाही आणि दुर्लक्ष केलं त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.