तो परतलाय...! कोकणासह राज्याच्या 'या' भागांत मुसळधार

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसानं उसंत घेतलेली असतानाच आता मात्र राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस परतल्याची चिन्हं आहेत.   

सायली पाटील | Updated: Aug 11, 2023, 07:13 AM IST
तो परतलाय...! कोकणासह राज्याच्या 'या' भागांत मुसळधार  title=
Maharashtra Rain Update few parts of konkan to vitness light rainfall

Maharashtra Rain Update : ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा पूर्ण होण्याची वेळ आली तरी पावसाचा काहीही थांगपत्ता नाही. त्यामुळं हा मोसमी पाहुणा माघारी फिरला की काय? असाच चिंतातुर करणारा प्रश्न अनेकांनी विचारला. आता याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी खुद्द पाऊसच आला आहे. मोठ्या विश्रांतीनंतर राज्याच्या काही भागांमध्ये आता पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या कोकण पट्ट्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊसधारा बरसणार आहेत. 

राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उर्वरित भागात मात्र वरुणराजा अधूनमधून हजेरी लावून जाताना दिसेल. तर, बहुतांशी वेळ काळ्या ढगांची चादर पाहायला मिळणार आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांच्या काही भागांमध्ये ऊन- पावसाचा खेळ पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं आठवड्याच्या शेवटी तुम्ही कुठं पावसाळी सहलीसाठी निघणार असाल तर, सर्वप्रथम पावसाचा अंदाज नक्की घ्या. कारण पाऊस नसला तरी तुम्हाला निसर्गानं मुक्तहस्तानं केलेली उधळण नक्की पाहायला मिळेल. त्यामुळं पावसाळी सहलीचा बेत फसणार नाही हे नक्की. 

जाणून घ्या हवामानाची सद्यस्थिती 

हवमान खात्यानं पावसाळी स्थितीची माहिती देत प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशचा इशान्य भाग आणि नजीकच्या समुद्रसपाटीपासूनच्या भागावर सध्या 3.1 किमी उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळं मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सर्वसामान्य स्थितीहून उत्तरेकडे झुकलेला दिसत आहे. ज्यामुळं महाराष्ट्रातील मान्सूनमध्ये व्यत्यय आल्याचं कळत आहे. राज्यातील पावसाळी वातावरणाच मधून येणारी उघडीप याच कारणामुळं पाहायला मिळतेय. 

हेसुद्धा वाचा : घर घेताय, सावधान! वसई-विरामध्ये मोठा हाऊसिंग घोटाळा उघडकीस, अशी होते फसवणूक

 

उत्तर भारतात पावसाचं थैमान 

तिथं बिहार आणि नेपाळमधील पावसाचा फटका पाटना येथे बसत असून, गंगा नदी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे. तर, उत्तराखंडमध्ये हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. 10 ते 14 ऑगस्टदरम्यान उत्तराखंजडमध्ये रेड अलर्ट देण्यात आला असून, देहरादून ,पौड़ी , टिहरी, नैनीताल, उधम सिंह नगर आणि चंपावत इथं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

पुढील 24 तासांमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, जम्मू काश्मी आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं मोठ्या सुट्टीसाठी तुम्ही यातील कोणत्याही भागाला  भेट देणार असाल तर आधी हवामानाचा अंदाज लक्षात घ्या.