Raigad Rain Video : पावसाळा आता कुठं खऱ्या अर्थानं सुरु झाला असून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये नदीनाले आणि धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. पावसाळ्यातील हीच परिस्थिती पाहता अनेक फिरस्त्यांनी भटकंतीसाठी गडकिल्ल्यांच्या वाटा धरल्या आहेत. ट्रेकिंग करणाऱ्या मंडळींनी जणू याच ठिकाणांवर जाण्यासाठी इतकी प्रतीक्षा केली होती, असाच माहोल सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.
असं असलं तरीही दुरून डोंगर साजिरे, हे असंच चित्र सध्या योग्य असल्याचा इशारा प्रशासन वेळोवेळी देत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पावसाळी पर्यटनाच्या निमित्तानं विविध ठिकाणी गेलेल्या पर्यटकांसमवेत घडलेल्या अप्रिय घटनांमुळं आता प्रशासन सावध झालं असून, गर्दी होणार असल्याच्या अपेक्षित स्थळांवर आतापासून प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे, रायगडही त्यापैकीच एक.
रविवारी रायगडावर काही पर्यटकांना ढगफुटीसदृश्य पावसानं गाठलं आणि त्यानंतर घडलेल्या संपूर्ण थरारानंतर प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत. प्राथमिक स्तरावर गडावर जाणारा पायरी मार्ग रोप वे पुढील आदेश मिळेपर्यंत बंद राहणार असल्याच्या सूचना प्रशानानं दिला. ज्यानंतर खुद्द गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आणि छत्रपती कुटुंबातील संभाजीराजे छत्रपती यांनीही पर्यटकांना सावध करणारं आवाहन केलं.
'दुर्गराज रायगड आणि रायगड परिसरात संतंधार अतिवृष्टी सुरू असल्याने शिवभक्तांच्या सुरक्षतेसाठी येत्या 31 जूलै 2024 पर्यंत गडावर शिवभक्तांना आणि पर्यटकांना जाता येणार नाही. याची सर्व शिवभक्तांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व रायगड विकास प्राधिकरण यांच्या वतीने करण्यात येत आहे. दुर्गराज रायगड वर येणाऱ्या, तसेच पावसाळी पर्यटनाला जाणाऱ्या सर्वच नागरिकांना मी आवाहन करतो आपला जीव धोक्यात घालू नये. स्वतःची व कुंटुंबाची सुरक्षितता प्राधान्याने पहावी', असं लिहित संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडाचा नुकताच टीपलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
गडावरील कातळाच्या भींतींवरून आणि डोंगरकड्यांवरून ओसंडून वाहणारे धबधबे, वाट मिळेल तिथून आणि वाट मिळेत तसं वेडंवाकडं- प्रचंड ताकदीनं वाहणारं पाणी असं एकंदर चित्र सध्या रायगडावर पाहायला मिळत असल्याची माहितीच हा व्हिडीओ देत आहे.