क्षणात बदलतंय राज्यातील हवामान; आता कोणत्या भागात मुसळधार?

Maharashtra Rain : मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागाला उन्हाच्या झळा, मराठवाड्यात पाणीटंचाई. तुमच्या इथंही ही परिस्थिती उदभवायला फार वेळ लागणार नाही, कारण...  

सायली पाटील | Updated: Aug 10, 2023, 08:08 AM IST
 क्षणात बदलतंय राज्यातील हवामान; आता कोणत्या भागात मुसळधार?  title=
Maharashtra Rain climate change konkan vidarbha to vitness moderate rainfall

Maharashtra Rain : यंदाच्या वर्षी पावसानं महाराष्ट्र निर्धारित तारखेपेक्षा उशिरानं गाठला. त्यातही जून महिन्यात तो काही फारसा बरसला नाही. पण, जुलै महिना मात्र पावसानंच गाजवला. ऑगस्ट महिन्यात हा मोसमी पाहुणा पुन्हा एकदा लपंडाव खेळताना दिसला. आता ऑगस्ट महिना सुरु होऊन पहिले दहा दिवसही ओलांडले तरी राज्याच्या काही भागांतील पावसाची विश्रांती मात्र संपलेली दिसत नाही. मुंबई, नवी मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागातही पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळालं. 

मधून येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरीनं अनेकांची त्रेधातिरपीट उडवली खरी पण, ही सर पाणीटंचाईसारख्या समस्या मिटवण्यास पुरेशी नाही हीच वस्तुस्थिती. राज्यात आता पुढचे काही दिवस नेमकं कसं पर्जन्यमान असेल यांची अनेकांनाच चिंता लागून राहिलेली असताना आता नव्यानं हवामानाचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. ज्या धर्तीवर येत्या काही दिवसांत पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

आठवडी सुट्टी पाऊस गाजवणार... 

पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पालघर, ठाण्यासह मुंबई आणि नवी मुंबईच्या काही भागांना पुढील 48 तासांसाठी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, पुढील दोन दिवसांमध्ये सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरीमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसेल असा इशारा देण्यात आला आहे. 

तिथं विदर्भातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे. विदर्भाच्या नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोल्यासह इतर काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल. तर, मराठवाड्याची तहानही हा पाऊस भागवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. संभाजीनगरपासून नांदेडपर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता आयएमडीनं वर्तवली आहे. तर पश्चिम महाराष्ट्र पट्ट्यात येणाऱ्या सातारा, कोल्हापूर भागातही पावसाची हजेरी असेल असं सांगिण्यात आलं आहे. ज्यामुळं या आठवड्याचा शेवट पावसानं होईल हे आता स्पष्ट होत आहे. 

उत्तर भारतात पावसाचा जोर... 

तिथं उत्तर भारतामध्ये सध्या पावसानं चांलगा जोर धरल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानसह पंजाब आणि जम्मू काश्मीरपर्यंत पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळं सखल भागांमध्ये असणाऱ्या गावांना याचा पटका बसताना दिसत आहे.