अजित पवार आणि अमोल कोल्हे पुन्हा एकत्र येणार? आता ‘दादां’नी स्पष्टच सांगितलं!

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. सेलिब्रीटींना तिकिट देतो ही आमती चूक आहे, असे अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.

आकाश नेटके | Updated: Mar 4, 2024, 12:44 PM IST
अजित पवार आणि अमोल कोल्हे पुन्हा एकत्र येणार? आता ‘दादां’नी स्पष्टच सांगितलं! title=

Maharashtra Politics : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गट सत्तेत जाऊन बसला आहे. यावरुन शरद पवार गटाने अजित पवार गटाला सातत्याने लक्ष्य केलं आहे. वारंवार दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने अजित पवार गटच राष्ट्रवादी असल्याचे निर्णय दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावेळी अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र आता अजित पवार यांनी अमोल कोल्हेंसोबत पुन्हा जाणार का याबाबत भाष्य केलं आहे.

शिरुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवार यांच्यावर घणाघात केला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी लोक दादा पुढे काय होईल का असे विचारतात असं म्हटलं. लोकांच्या मनात तशा प्रकारची शंका आहे असं वाटतं असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार - अमोल कोल्हे पुन्हा एकत्र येणार?

"लोकांना असं वाटत हे कधीतरी एकत्र येतील का. पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो आता फाटी पडली आहेत. ते एका टोकाला आपन एका टोकाला आहोत. मी अमोल कोल्हेंसाठी मत मागितली. नंतर कोल्हे दोन वर्षांनी राजीनामा देतो म्हटले. अमोल कोल्हे माझ्या व्यवसायावर परिणाम झाल्याने राजीनामा देतो म्हटले होते. खरंच राजकारण हा कोल्हेंचा पिंडच नाही. सेलिब्रीटींना तिकिट देतो यात आमच्या ही चुका आहेत. पण त्यांच्या डोक्यात काय असतं हे आम्हालासुद्धा माहित नसतं. शिवनेरीला भेटले तेव्हा कोल्हे म्हणाले मला परत उभं रहाव वाटतंय. असं कसं चालेल," असे अजित पवार यांनी म्हटलं.

"उद्याच्या लोकसभा निवडणूकीत कोल्हे म्हणतील आता मी काम करतो. पण परत चुक करू नका. मतदार संघात नाटकांचे शो करत आहेत. पण आता देशाची हवा मोदींच्या बाजूने आहे. मोदी की गॅरंटी आहे. त्यामुळे केद्र सरकारच्या विचारांचा खासदार निवडून द्या. वढू तुळापुरच्या कार्यक्रमात मला अहमदनगरच्या कार्यक्रमाला जायचे म्हणून मध्येच अमोल कोल्हे निघाले. त्यांच्या पाठीमागे अशोक पवार देखील निघाले," असा टोला अजित पवार यांनी लगावला.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत आता माझी चांगली ओळख झालेली आहे. मी त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवत आहे. लवकरच साडेआठ लाख सोलरवर चालणारे पंप शेतकऱ्यांना देणार आहोत. सोलर पॅनलची योजना महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेली आहे," असेही अजित पवार म्हणाले.