रोहित पवारांना ईडीची नोटीस; शरद पवार म्हणाले, 'सहा महिने तुरुंगात...'

Sharad Pawar On ED Notice : आमदार रोहित पवार यांना आलेल्या ईडी नोटीशीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांना 24 जानेवारी रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 20, 2024, 11:23 AM IST
रोहित पवारांना ईडीची नोटीस; शरद पवार म्हणाले, 'सहा महिने तुरुंगात...' title=

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी नोटीस पाठवली आहे. ईडीने आमदार रोहित पवार यांना 24 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. रोहित पवार यांच्यासह मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. सत्ताधारी भाजपवर विरोधी पक्षांकडून सातत्याने हल्लाबोल केला जात असताना आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप होत असतानाच या दोघांनाही समन्स प्राप्त झालं आहे. रोहित पवार यांना आलेल्या ईडीच्या नोटीशीवर प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोशी संबंधित कारखाने आणि कार्यालयांवर ईडीने छापे टाकले होते. रोहित पवार हे बारामती अॅग्रोचे संचालक असून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. ईडीचे अधिकारी त्यांचे काम करत आहेत. तपासात ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. सोलापुरात बोलताना शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"संजय राऊत, अनेक देशमुख  यांनासुद्धा ईडीची नोटीस आली आली आहे. अनिल देशमुख सहा महिने तुरुंगात राहिले आहे. ईडीचा वापर विरोधकांविरुद्ध होत आहे. सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा दुरुपयोग होत आहे. मलाही ईडीची नोटीस झाली होती. रोहित पवार यांना नोटीस आली असेल. पण चिंता करायची कारण नाही," असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

या नोटीसीनंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. "ईडीच्या बातमीमुळं राज्यातून अनेकांनी फोन/मेसेज केले. या सर्वांचे मनापासून आभार मानतो, परंतु काळजीचं काहीही कारण नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते तर ते केवळ आदेशाचं पालन करुन त्यांचं काम करत असतात म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढंही राहील. म्हणूनच ईडीला विनंती केलीय की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर 24 तारखेऐवजी 22 किंवा 23 तारखेलाच चौकशीला बोलवावं, तशी माझी तयारी आहे. मला अपेक्षा आहे की, ईडी ही विनंती मान्य करेल," असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ईडीने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना 25 जानेवारीसाठी समन्स बजावले आहे. बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांना समन्स बजावण्यात आले आहे. दुसरीकडे, रोहित पवार यांना यापूर्वीच वेगवेगळ्या प्रकरणात केंद्रीय यंत्रणांकडून नोटिसा आल्या आहेत.