Maharashtra Politics : 40 आमदारांसह 12 खासदारांच्या फुटीनंतरही शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अद्याप धक्के बसतच आहेत. राज्याती शिंदे - फडणवीस सरकार येताच उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. अनेक निष्ठावंतांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाला (Thackeray Group) गळती सुरुच आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय मानली जाणारी व्यक्ती आता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक दौऱ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का
काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी नाशिक दौरा केला. संजय राऊत यांची पाठ फिरताच ठाकरे गटाच्या काही माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी (Bhau Chaudhary) हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
संजय राऊत यांचे निकटवर्तीय
भाऊ चौधरी हे संजय राऊत यांच्या जवळचे मानले जात होते. नाशिक संपर्कप्रमुख म्हणून ते काम पाहत होते. संजय राऊत यांना अटक झाल्यानंतरही भाऊ चौधरी हे त्यांच्या सोबत होते. मात्र आता भाऊ चौधरी हे ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर हकालपट्टी
भाऊ चौधरी शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांची जिल्हा संपर्क पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. संजय राऊत यांनीच ट्विट करत ही माहिती दिली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. "शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे," असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे@OfficeofUT
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 21, 2022
जिल्हाप्रमुखांचाही राजीनामा
भाऊ चौधरी यांची हकालपट्टी होताच त्यांच्या समर्थकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. भाऊ चौधरी यांचे समर्थक असलेले ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनीही आपला पदाचा राजीनामा दिलाय. भाऊ चौधरी यांच्या समर्थनार्थ सुनील पाटील यांनी थेट फेसबुक पोस्टद्वारेच आपला राजीनामा दिलाय.
शिंदेंसोबत भविष्य उज्वल - सुहास कांदे
भाऊ चौधरी यांच्या हकालपट्टीवरुन शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांना विश्वासात घेतलं नाही असा टोला सुहास कांदे यांनी लगावला आहे. "मैत्री वेगळी आणि राजकीय भविष्य वेगळे असतं. त्यामुळे भाऊ चौधरींना वाटलं असेल की ठाकरे गटापेक्षा शिंदेंसोबत भविष्य उज्वल असेल. भाऊंना काढून टाका असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे, असा ट्वीट मध्ये उल्लेख आहे. संजय राऊतांना विश्वासात घेतलं असेल की नाही मला माहीत नाही. पण राजकीय भविष्य उज्ज्वल असेल," असे सुहास कांदे यांनी म्हटलं आहे.