सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 139 उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाने जास्त जागांची मागणी केल्याने जागावाटप अद्याप रखडलेलं आहे. दुसरीकडे पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपमध्येच अंतर्गत जोरदार कलह पाहायला मिळत आहे. उमेदवारीवरुन भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलंच शीतयुद्ध होताना दिसतय.
लोकसभा निवडणूक जवळ आली तरी पुण्यात भाजपचा उमेदवार काही ठरलेला नाही. भाजपकडून माजी खासदार संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची नावे शर्यतीमध्ये आहेत. भाजपने आपला उमेदवार ठरवण्यासाठी तब्बल चार सर्व्हे केले आहेत. मात्र अजूनही उमेदवार कोण असेल यावर एकमत झालं नाही. अशातच आता भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. दुसरीकडे पुणे महापालिकेत मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
भाजपतर्फे उमेदवारीच्या शर्यतीत सर्वात पुढे असणारे मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आता भाजप कार्यकर्तेच आक्रमक झालेले दिसत आहे. पुणे महापालिका आवारात मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. ''स्टँडिंग दिली, महापौर दिलं, सरचिटणीस बनवलं. खासदारकी पण देणार? आता बस झालं... तुला नक्की पाडणार'' अशा आशयाचे बॅनर पुणे महानगरपालिका आवारात लावण्यात आले होते. अज्ञातांनी हे बॅनर लावले असले तरी बॅनर वर ''कष्टाळू भाजप कार्यकर्ते'' असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे भाजपचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आल्याचं चित्र दिसत आहे.
ही भाजपची संस्कृती नाही - संजय काकडे
"निवडणुकीपूर्वी शहरातील वातावरण दूषित करण्याचा हा प्रकार आहे. अशा पद्धतीचे बॅनर झळकावून उमेदवारी देण्याबाबतच्या निर्णयात कोणताही फरक पडत नसतो. हा प्रकार बालिशपणाचा आहे. पण मी एक ठामपणे सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाची ही संस्कृती नाही. हा बॅनर लावण्याचा प्रकार विरोधकांनी केला असावा. अशा पद्धतीचे बॅनर लावून एखाद्याची इमेज डगमगू शकत नाही. उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो. त्यामुळे असे बॅनर लावून उमेदवारी देण्यावर काहीच परिणाम होणार नाही," असे माजी खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सुरुवातीला या पद्धतीचा समाज माध्यमावर फिरणारा मेसेज आणि त्यानंतर थेट महापालिका आवारातच लावण्यात आलेल्या बॅनरमुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली इतकं नक्की.