Maharashtra Politics : राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे काका शरद पवार यांच्यात टीका जोरदार वाद सुरु आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार आरोप करत आपला गट खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला दिला होता. 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नाशिकमध्ये बोलताना अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर टीका केली होती. मी जे बोलतो ते वस्तुस्थितीला आधारित असते. मी काही लेचापेचा नाही. परखडपणे बोलण्याची धमक माझ्यात आहे. खरेच सांगतो वयाच्या 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे. नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला हवी, असा टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली होती. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना अजित पवार यांना टोला लगावला आहे.
"बापाला कधी रिटायर करायचं नसतं. बाप घरातला उर्जास्त्रोत असतो. आई बापाविना घर सुनेसुने वाटू लागतं," असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
"मी काही लेचापेचा नाही, जी वस्तूस्थिती आहे ती बोलणारा माणूस आहे. तुमच्या तोंडावर एक बोलायचं आणि तुमच्या पाठीमागे वेगळं बोलायचं असं मी करत नाही. तुम्ही मागे फिरल्यावर दुसरंच काहीतरी बोलायचं, असं माझ्याकडे चालत नाही. मी अशा प्रकारची व्यक्ती नाही. हे तुम्ही लक्षा घ्या. तुम्ही जर गेल्या 30-35 वर्षांमधील माझ्या गोष्टी ऐकल्या तर तुम्हालाही वाटेल की आता या लोकांनासुद्धा संधी दिली पाहिजे आणि या 80-85 वर्षाच्या लोकांनी आशीर्वाद देण्याचं किंवा सल्ला देण्याचं काम केलं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे," असे अजित पवारांनी म्हटलं होतं.
अजित पवारांनी पुन्हा साधला निशाणा
रविवारी मुंबईत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा वयावरुन भाष्य केलं आहे. "वय झाल्यानंतर थांबायचं असतं. ही वर्षोनुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. पण, काहीजण ऐकण्यास तयार नाहीत. हट्टीपणा करतात. सरकारमधील कर्मचारी 58 व्या वर्षीच निवृत्त होतात. काहीजण 65, 70 आणि 75 व्या वर्षी निवृत्त होतात. मात्र, 84 वय झालं तरी तुम्ही थांबेना.अरे काय चाललंय काय. आम्ही आहोत ना काम करायला. कुठं चुकलो तर सांगाना. आमच्यात तेवढी धमक आणि ताकद आहे. पाच ते सहावेळा उपमुख्यमंत्री पद सांभाळलं आहे, असे अजित पवार म्हणाले.