मुंबई : महाराष्ट्राचं राजकारण सध्या चांगलंच तापलंय. राजकारणात सुरु असलेल्या मोठ्या घडामोडींमुळे शिवसेनेमुळे मोठी फूट पडताना दिसतेय. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेलं हे राजकीय नाट्य कोणत्या वळणावर येऊन पोहोचणार याकडे आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. आतापर्यंत घडलेल्या घडामोडींवरून पुढील 3 तासात 3 मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
मुख्य म्हणजे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रभारी राज्यपाल नव्या मुख्यमंत्र्यांना पाचारण करतील. यावेळी बहुमत सिद्ध करायला सांगण्यात येऊ शकतं. प्रभारी राज्यपालांच्या देखरेखेखाली या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा कठीण परिस्थितीत सभागृहाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात येऊ शकतं. विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्यासंबधी काही महत्त्वाच्या गोष्टी घडू शकतात. अधिवेशनात जर बहुमत सिद्ध होत असेल तर महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागेल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरण्याची दाट शक्यता आहे.
बहुमत गेल्याने साहजिकच कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सर्वच चित्र स्पष्ट होईल.