ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : सातत्याने आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असणारे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मंत्री तानाजी सावंत यांचा एका वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मी सांगतो तेच काम करायचं, मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नसतो असे या व्हिडीओमध्ये तानाजी सावंत म्हणताना दिसत आहे. तानाजी सावंत यांच्या या व्हिडीओमुळे आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तानाजी सावंत यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाली आहे. मी सांगतो तसंच तेच काम करायचं, मी मुख्यमंत्र्यांच सुद्धा ऐकत नसतो अशा शब्दात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दम भरल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. मात्र तानाजी सावंत यांनी पोलीस अधीक्षकांना कोणतं काम सांगितलं होतं ही गोष्ट मात्र या व्हिडिओतून स्पष्ट होत नाही. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडून मात्र या व्हिडिओबद्दल कोणतेही स्पष्टीकरण आलेलं नाही.
काय म्हणाले तानाजी सावंत?
नो कॉम्प्रमाईस, नंतरचे नंतर बघू, कोणतीही चर्चा नको. मी सांगितले ते करायचे. मुख्यमंत्र्याचेही असले तरी ऐकत नाही, असे तानाजी सावंत यांनी म्हणताना दिसत आहेत.
याआधीही अडकले वादात
दरम्यान, आरोग्यमंत्री असलेले तानाजी सावंत हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे अडचणीत येत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी हाफकिन माणसाकडून औषधं घेणे बंद करा असं म्हटलं होतं. त्यावेळी त्यांच्या स्वीय सहाय्यकाने हाफकीन ही शासकीय संस्था आहे, माणूस नाही, असे सांगितले होते. मराठा आरक्षणाबाबतही तानाजी सावंत यांनी भाष्य केले होते. आरक्षण कधी मिळेल हे सांगायला मी काही पंचांग घेऊन बसलो नाही, हा लढा आहे. काही बाबी कायदेशीर आहेत. आज एका पद्धतीने शासनाची दमछाक करून आताच्या आताच आरक्षण द्या, कागदावर लिहून द्या अशी भूमिका घेतली जात आहे. पण आरक्षण टिकलं पाहिजे ते महत्वाचं आहे, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं होतं.