Uddhav Thackeray Group On Win In Maharashtra: "शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडून मोदी-शहांनी घाणेरडे राजकारण केले," असं म्हणत ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांसहीत भाजपावर निशाणा साधला आहे. 'सामना'च्या अग्रलेखामधून ठाकरे गटाने या निकालाच्या माध्यमातून जनतेनं सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचा टोला लगावला आहे. राष्ट्रीय पातळीवरील निकालाबरोबर राज्यात महाविकास आघाडीने मिळवलेल्या अभूतपूर्व यशासंदर्भातही ठाकरे गटाने आपली भूमिका मांडली आहे.
"शिवसेना-राष्ट्रवादी फोडण्याने महाराष्ट्रात एकतर्फी विजय मिळवता येईल या भ्रमाचा भोपळा मराठी जनतेने फोडला. सत्तेचा अमर्याद वापर, पैशांचा ‘धो-धो’ पाऊस ‘मिंधे’ सेनेने पाडला. अजित पवारांनी अनेक मतदारसंघांत धमक्या दिल्या, दहशत केली. फडणवीसांनी अनाजीपंतांचे राजकारण केले. या सगळ्या कारस्थानांचा पराभव महाराष्ट्राने केला. मोदी-शहांनी मिळून महाराष्ट्रात पन्नास सभा घेतल्या, पण हाती काहीच लागले नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. "महाराष्ट्रात भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला," असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.
"शिवसेनेच्या काही हक्कांच्या जागेवर अपयश आले. अर्थात शिवसेनेने विषम परिस्थितीत संघर्ष केला. पक्ष गेला, चिन्ह गेले, आर्थिक ताकद नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेने दोन आकड्यांत जागा जिंकल्या. महाविकास आघाडी म्हणून 30 जागा जिंकणे हा धनशक्ती व सरकारी यंत्रणेचा पराभव आहे," असं राज्याच्या निकालासंदर्भात बोलताना ठाकरे गटाने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 'आई तिच्या पक्षासाठी..', सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर पार्थची पोस्ट; लोक म्हणाले, 'आजोबांकडे..'
"केरळ, प. बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश ही राज्ये भाजपच्या पाठीशी राहिली नाहीत. तामीळनाडूने तोच मार्ग स्वीकारला. आंध्रात जगनमोहन रेड्डी व त्यांचा पक्ष पराभूत झाला. तेथे तेलुगू देसम व चंद्राबाबूंनी उसळी मारली. कर्नाटक, बिहारात ‘इंडिया’ आघाडीस अपेक्षित यश मिळाले नाही. ते मिळाले असते तर ‘इंडिया’ आघाडीला बहुमताचा आकडा सहज पार करता आला असता. तसे घडले नाही तरीही मोदींच्या अहंकाराचा रथ चिखलात अडकला," असा टोला ठाकरे गटाने लागवला आहे. "मोदी व त्यांचे लोक तिसऱ्यांदा दिग्विजय प्राप्त करतील असे नगारे वाजवणारे आता थंड पडले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला पन्नास जागाही मिळणार नाहीत अशा वल्गना करणाऱ्यांचे दात घशात गेले. मोदी यांचे तथाकथित देवत्वाचे पितळ उघडे पडले," अशी टीका उद्धव ठाकरे गटाने केली आहे.
नक्की वाचा >> 'मोदी स्वतःला हिंदूंचे नवे शंकराचार्य..', ठाकरे गटाची सडकून टीका; म्हणाले, '400 पारचा नारा..'
"दिल्लीत पुढे काय होणार, हा प्रश्न महत्त्वाचा. अल्पमतातल्या ‘एनडीए’चे नेतृत्व स्वीकारून मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घ्यायला पुढे जातील काय? सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप नक्कीच पुढे आला, पण त्यांच्या एनडीएचे बहुमत हे टेकूवरचे आहे व ते टेकूही डळमळीत आहेत. देशाच्या जनतेने अहंकारी मोदी व त्यांच्या अमित शहांना निरोप दिला आहे. त्यांच्या अहंकाराचा गाडा रोखला आहे. सत्ता टिकविण्यासाठी पुन्हा भ्रष्ट मार्गाचा, फोडाफोडीचा मार्ग स्वीकारला तर लोकांचा उद्रेक रस्त्यावर येईल. देशातील लोकशाहीचा अफाट, अपूर्व, अलौकिक विजय झाला आहे. देशाच्या जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, तो तसाच राहील.