Zero Mile Stone Nagpur : निसर्गसौंदर्याने संपन्न तसेच गड, किल्ल्यांसह अनेक ऐतिहासिक वास्तूंचा वारसा आपल्या महाराष्ट्राला आहे. फक्त ऐतिहासिक दृष्ट्याट नाही तर भौगौलिक दृष्ट्या देखील महाराष्ट्र तितकाच महत्वाचा आहे. कारण, भारताचा मध्यबिंदू हा महाराष्ट्रात आहे. भारतातील विविध राज्यांचे भौगोलिक स्थान ठरवणारा झिरो माइल स्टोन महाष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आहे. जाणून घेऊया नागपुरातील शून्य मैल दगड अर्थात झिरो माइल स्टोनच्या निर्मीती मागची रंजक कहानी.
महाराष्ट्राची उपराजधानी, संत्र्यांचे शहर अशी नागपूरची ओळख. मात्र, नागपूर शहरात असलेल्या झिरो माइल स्टोनमुळे आणखी एक वेगळी ओळख मिळाली आहे. भौगौलिकदृष्ट्या झिरो माइल स्टोन अत्यंत महत्वाचा आहे. यामुळे झिरो माइल स्टोन हे नागपूरात येणाऱ्या पर्यटकांचे देखील प्रमुख आकर्षण आहे.
झिरो माइल स्टोन अर्थात शून्य मैलाचा दगड. पण हा झिरो माइल स्टोन नेमका आहे तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घेऊया याचं उत्तर. 1767 मध्ये भारताचा नकाशा तयार करण्यासाठी ब्रिटिशांनी ट्रिग्नोमॅट्रिक सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली होती. भारताचे क्षेत्रफळ आणि चहुबाजूचे अंतर मोजता यावे म्हणून नागपुरातच एक मध्यबिंदू निश्चित करण्यात आला होता. नागपुरमध्ये असलेला भारताचा मध्यबिंदू ब्रिटिशांनी नाव दिलेला हा झिरो माईल स्टोन देशासाठी भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा ठरला आहे.
देशासाठी भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा ठरलेला झिरो माइल स्टोन पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनला आहे. देशभरातून नव्हे तर परदेशातूनही पर्यटक हा झिरो माइल स्टोन पाहण्यासाठी येतात. भारताचा नकाशा तयार करताना ब्रिटिशकालीन सर्वेक्षणावेळी संपूर्ण देशभरात असे साधारणत: 80 शून्य मैलाचे दगड उभारले गेले. मात्र. देशाचा मध्य बिंदू म्हणून ओळखला जाणारा नागपूरच्या शून्य मैलाचा दगड अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या ठिकाणी एक स्तंभ आणि एका ठिकाणाहून चारही दिशांचे प्रतीक म्हणून चार धावत्या घोड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. वाळूच्या दगडांनी हा स्तंभ बांधण्याकत आला आहे. चार घोडे राजस्थानहून आणण्यात आल्याचे सांगण्यात येते. झिरो माइल स्टोनच्या बाजूलाच जी. टी. एस. दगड (GTS Stone Nagpur) हा तत्कालीन विशाल त्रिकोणमितीय सर्वेक्षणाचा एक साक्षीदार असलेला दगज देखील पहायला मिळतो. झिरो माइल स्टोनच्या माध्यमातूनही त्याच्या चहोबाजुला असलेल्या कवठा, हैदराबाद, चंदा, राजपूर, जबलपूर, सीओनी, छिंदवाडा, बैतुल शहरांची अंतरे दर्शविली आहेत.