Maharashtra Hit and Run Case : पुण्यातील हिट अँड रनची केस चर्चेत असतानाच उपराजधानी नागपुरातही (Nangpur Hit and Run) असाच धक्कादायक अपघात घडला. नागपुरीतील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल भागातील झेंडा चौकात शुक्रवारी रात्री मद्यधुंद कारचालकाने बेदरकारपणे तिघांना उडवलं. सचिन सुभेदार हे टपरीवर चहा प्याल्यानंतर बाईक काढत असताना भरधाव कारनं त्यांना जोरदार धडक दिली. त्यातवेळी रस्त्यावरून चालत असलेली नाझमिन शेख ही महिला आणि तिच्या हातात असलेल्या अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकलीला त्या कारने उडवलं.
याप्रकरणी पोलिसांनी सनी चव्हाण, अंकुश ढाले आणि आकाश महेरूलिया अशा तिघा आरोपांना अटक केलीय. सनी हा गाडी चालवत होता. धक्कादायक म्हणजे आरोपींच्या गाडीत दारूच्या 3 बाटल्या आणि गांजा सापडलाय.. यापैकी सनी चव्हाण आणि अंकुश ढाले हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत...
जळगावतही 'हिट अँड रन'
जळगावातील (Jalgoan Hit And Run) रामदेव वाडीत गेल्या 7 मे रोजी झालेल्या भीषण अपघातात महिला आणि मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला होता. तब्बल 18 दिवसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी अखिलेश पवार आणि अर्णव कौल अशा दोघांना जळगाव पोलिसांनी मुंबईतून अटक केली. त्यांना 27 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. आरोपींपैकी अखिलेश पवार हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा आहे. तर अर्णव हा सरकारी कंत्राटदार आणि बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा आहे. अर्णव गाडी चालवत होता.
पुणे कार अपघातात तीन पिढ्या जेलमध्ये
पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी (Pune Porsche Accident) अग्रवाल बाप लेकांपाठोपाठ आता आजोबालाही जेलमध्ये डांबण्यात आलंय. ड्रायव्हरला डांबून ठेवून त्याला धमकावल्याप्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केली. त्याला 28 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. दारुच्या नशेत गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपाली सध्या बाल सुधारगृहात ठेवण्यात आलंय. त्याचे वडील विशाल अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर आजोबा सुरेंद्रला आज पोलीस कोठडीत डांबण्यात आलं. त्यामुळे अग्रवाल कुटुंबियांच्या तीन पिढ्या आता जेलमध्ये आहेत.
बड्या धेंडांच्या मुलांनी दारूच्या नशेत अपघात करून सामान्य लोकांचा जीव घेतल्याच्या घटना वाढू लागल्यात. पुणे, नागपूर, जळगाव ही त्यातली काही उदाहरणं. दारुच्या नशेत वाहन चालवण्याची हिंमत होतेच कशी? हा खरा सवाल आहे. कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही, हेच या वाढत्या घटनांवरून समोर येतंय..