मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत जलदगतीने निर्णय घ्या अशी मागणी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे केल्याची माहिती झी २४तासची सहकारी वाहिनी झी न्यूजच्या सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चर्चा सुरु आहे. मात्र अद्यापही त्यातून ठोस निर्णय लागत नाही. दरम्यान शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर बाहेर आल्यावर आमची महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेवर किंवा शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काहीही चर्चा झाली नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. त्यामुळे शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या एका गटात असंतोषाचं वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याची कल्पना आल्यानं त्यांनी सत्ता स्थापनेचा निर्णय जलदगतीन घ्या अशी मागणी केली आहे. यासाठी ते काँग्रेस-राष्ट्रवादीला १ डिसेंबरची मुदतही देऊ शकतात. एक डिसेंबर पर्यंत सरकार स्थापन न झाल्यास शिवसेना दुसऱ्या पर्यायाचा विचार करु शकते अशी माहिती झी न्यूजच्या सूत्रांनी दिली आहे.
पवार आणि सोनियांच्या सोमवारच्या भेटीत सत्तास्थापनेची काहीच चर्चा झाली नाही, असं पवार सांगत होते, म्हणजेच तेव्हाच सगळं फुल अँड फायनल झालं होतं.त्यावर काँग्रेस चौकडीच्या सकाळच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. तिकडे शिवसेनेनंही पुढच्या चर्चेची तयारी केली आहे. शुक्रवारी मातोश्रीवर आमदारांबरोबर महत्त्वाची बैठक होतेय. संपूर्ण तयारीनिशी या... असं आमदारांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढच्या दोन ते तीन दिवसात ती सो कोल्ड बातमी कुणाकडून तरी मिळेलच, असं आता तरी दिसत आहे.