Maharashtra Bhushan: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार

Maharashtra Bhushan: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Puraskar) जाहीर झाला असून 25 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देत गौरव केला जाणार आहे.  

Updated: Feb 8, 2023, 02:44 PM IST
Maharashtra Bhushan: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार title=

Maharashtra Bhushan: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Puraskar) जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) ट्वीट करत ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र शासनाचा (Maharashtra Government) सर्वोच्च पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार असून सोबत 25 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देत गौरव केला जाणार आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज रायगड दौऱ्यावर असून धर्माधिकारी कुटुंबीयांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत. त्याचवेळी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

महाराष्ट्र भूषण निवड समितीने आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाची शिफारस केली होती. या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केलं. आपल्या सामाजिक कार्यासाठी धर्माधिकारी कुटुंबाला ओळखलं जातं. धार्मिक तसंच सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ते नेहमी समाजप्रबोधन करत असतात. त्यासाठीच हा पुरस्कार देण्यात आल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. 

पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म 14 मे 1946 रोजी झाला आहे. रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये त्यांचं प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झालं. बालपणापासून त्यांना कीर्तन, भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती.

गेल्या 30 वर्षांपासून ते निरुपण करत आहेत. अंधश्रद्धा, बालमनावरील संस्कार यासाठी त्यांनी कार्य केलं आहे. त्यांनी विशेष बालसंस्कार बैठकाही सुरु केल्या आहेत. तसंच आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही करतात. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिनंदन

"2022 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पुरस्कार समितीने सर्वानुमते हा मानाचा पुरस्कार आप्पासाहेब यांना देण्याचा निर्णय घेतला असून याचा आम्हाला फार आनंद आहे. यापूर्वी पद्मश्री पुरस्कराने केंद्र सरकारने त्यांचा सन्मान केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे त्यांचं व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, वृक्षारोपण अशी अनेक सामाजिक कार्य आहेत. त्यांनी सामाजिक कार्यात आपल्याला वाहून घेतलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही देतो," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

"आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार दिल्याने या पुरस्काराचीच उंची वाढली आहे. त्यांचं कार्य या समाजजीवनात प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलं आहे. अनेक उद्ध्वस्त होणारी कुटुंब त्यांची प्रेरणा, मार्गदर्शनामुळे वाचली आहेत," अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.