आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली: गडचिरोलीच्या एका पोलीस हवालदार पदावर कार्यरत असणाऱ्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. रमेश बहिरेवार (वय 43 वर्ष) असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. रमेश बहिरेवार हे गडचिरोली जिल्ह्यात (gadchiroli news police constanble) चामोर्शी तालुक्यातील ठाकरी येथील रहिवासी असून मुलचेरा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार (police constable) म्हणून कार्यरत होते. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करणे शक्य नव्हते. परंतु पोलिस अधिक्षक निलोत्पल यांच्या प्रयत्नाने त्यांना चॉपरच्या साहाय्याने काही मिनिटांतच नागपूरला नेण्यात आले. उपचार सुरू असताना तिसऱ्याच दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पोलीस हवालदार रमेश बहिरेवार यांना अचानक हृदयविकाराचा (heart arrest) तीव्र झटका आला आहे याची माहिती मिळताच मुलचेराचे ठाणेदार अशोक भापकर यांनी रमेश बहिरेवार यांना उपाचारासाठी मुलचेरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून पुढील उपचारासाठी रेफर केले. (Maharashtra Gadchiroli Police constable Ramesh Bahirewar Dies Superintendent send him to hospital via helicopter Marathi News)
पोलीस निरीक्षक गणेश कड आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून त्यांना त्वरित गडचिरोली (gadchiroli news) येथे हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या वेदना पाहून ठाणेदार अशोक भापकर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल यांच्याशी संपर्क करून सविस्तर माहिती दिली. त्यांनी लगेच जिल्हा पोलीस दलासाठी असलेले चॉपर मुलचेराला पाठवण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी लगेच हेलिपॅडजवळ बंदोबस्त लावला. रुग्णाला ऑक्सिजन लावून हेलिपॅडवर आणले. मात्र, छातीत दुखत असल्याने त्या शिपायाला वेदना सहन होत नव्हत्या. अशात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नागपूरपर्यंत रुग्णाला पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी लागणारी औषधं आष्टी ग्रामीण रुग्णालय येथून मागवण्यात आली. अखेर मुलचेरा हेलिपॅडवर गडचिरोली पोलीस दलाचा चॉपर उतरले. रुग्णाला स्ट्रेचरवरून चॉपरमध्ये घेण्यात आले. मात्र, नागपूरपर्यंत सुखरुप पोहोचवायचे असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेली औषधं देणं आवश्यक होतं. त्यासाठी काही मिनिटं चॉपर (chopper) थांबविण्यात आले. आष्टीचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी अवघ्या 12 मिनिटात चारचाकी वाहनाने ती औषध पाठवल्याने रुग्णाला इंजेक्शन देऊन नागपूरला हलवण्यात आले. या दरम्यान अपर पोलीस अधिक्षक अनुज तारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकरे हे सतत ठाणेदार अशोक भापकर यांच्या संपर्कात होते.
जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि येथील ठाणेदारांनी रमेश बहिरेवार यांच्या उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न करून नागपूर येथील ऑरेंज सिटी हॉस्पिटलपर्यंत पोहोचविले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच तिसऱ्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश बहिरेवार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुली असा आप्त परिवार आहे. त्यांच्या जाण्याने बहिरेवार परिवारच नाही तर अख्ख्या जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.