बळीराजाचा आक्रोश! डोळ्यातून पाणी काढतोय कांदा, वांग्यानंही केला शेतकऱ्यांचा वांदा

कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे, आणि आता तर शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भावाने शेतकऱ्याला रडवलं आहे. 

Updated: Feb 27, 2023, 09:12 PM IST
बळीराजाचा आक्रोश! डोळ्यातून पाणी काढतोय कांदा, वांग्यानंही केला शेतकऱ्यांचा वांदा title=

अभिषेक अदप्पा आणि निलेश खरमरे, झी मीडिया :  जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यासमोरचं (Farmer) संकट काही केल्या होताना दिसत नाही. कधी अस्मानी तर सुलतानी संकटाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. चांगलं पीक येऊनही बाजारात शेतीमालाला (Agricultural Goods) कवडीमोल भाव मिळत असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. 

वांग्यानं केला शेतकऱ्यांचा वांदा
पुणे जिल्ह्यातल्या पुरंदरच्या कुंभारवळण गावातील नाना तिवटे या शेतकऱ्याने 11 गुंठ्यात लावलेलं वांग्याचं पीक उपटून फेकून दिलं आहे. कारण 95 किलो वांगी विकून त्याच्या हातात पडलेत केवळ 66 रुपये. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने करायचं तरी काय असा प्रश्न उपस्थित राहतो. म्हणूनच तिवटे कुटुंबानं संतापाच्या भरात सर्व वांग्याची रोपं शेतातून उपटून फेकून दिली.

डोळ्यातून पाणी काढतोय कांदा
याआधी असाच दुर्दैवी प्रसंग सोलापूरच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या वाट्याला आला. बार्शी तालुक्यातल्या बोरगावातल्या राजेंद्र चव्हाण नावाच्या शेतकऱ्याला मातीमोल दरानं 5 क्विंटल कांदा विकावा लागला. त्यांच्या कांद्याला अवघे 40 पैसे क्विंटल एवढाच भाव मिळाला. वाहतूक आणि सगळा खर्च वजा होऊन शेतकऱ्याच्या हातात केवळ २ रुपयांचा चेक पडला. हा चेक पाहून हसावं की रडावं, तेच कळेना.

भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल
वांगी असो, कापूस असो नाहीतर कांदा. शेतकऱ्यांचा मालच विकला जात नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. तीन-चार महिने काबाडकष्ट करून पिकवलेल्या शेतमालाच्या काढणीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हैराण झालाय.. शेतीसाठी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं, अशी चिंता त्याला लागलीय. शेतक-यांचे हाल कुत्रं खात नसताना, सत्ताधारी आणि विरोधी नेतेमंडळी निवडणुकीच्या राजकारणात मश्गूल आहेत. शेतमालाला हमीभाव देण्याचं आश्वासन हवेतच विरलंय. त्यामुळं आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. विधिमंडळात एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा शेतकऱ्यांना हमी भाव कसा मिळेल, याकडं आता तरी सरकार लक्ष देणार का? असा टाहो सामान्य शेतकरी फोडतोय.