मुंबई : राजकीय वर्तुळात विरोधकांवर सातत्यानं शाब्दिक तोफ डागणारे आणि दमदार व्यक्तीमत्त्वासाठी ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार कायमच आपली वेगळी छाप पाडताना दिसतात. (Ajit Pawar Maharashtra)
कुटुंबातूनच राजकारणाचं बाळकडू मिळाल्यामुळं या क्षेत्रात त्यांची सध्याची कारकिर्द थक्क करणारी आहे. अशा या राजकीय नेत्याचं खासगी आयुष्यही तितकंच रंजक आणि कुतूहल वाटावं असंच आहे. (Maharashtra Deputy CM)
बऱ्याचदा अजित पवार हे जनमानसाचे अजित दादा केव्हा होतात हे कळतही नाही. त्यांचा हाच अंदाज पाहायला मिळाला रत्नागिरी दौऱ्यावर.
नुकतंच त्यांनी रत्नागिरी दौऱ्यामध्ये काही चिमुकल्यांची भेट घेतली. यावेळी त्यांचा दिलखुलास स्वभाव सर्वांची मनं जिंकून गेला.
आम्ही 9 वाजता शाळेत पोहोचायच्या आधी तुम्ही मंत्रालयात कसे पोहोचता, असा प्रश्न विचारला असता, 'आमचे मोठे साहेब आहेत ना... शरद पवार यांचा दिनक्रम आम्ही पाहायचो. म्हणून मीसुद्धा मंत्रालयात जाऊन लवकर काम सुरु करतो', असं ते म्हणाले.
आपल्या आवडीचा खेळ कोणता याचाही उलगडा यावेळी त्यांनी केला. क्रिकेट, पत्ते, गोट्या, विटी दांडू असे खेळ खेळायला आपल्याला आवडतात, असं म्हणत त्यांनी काही खेळांचा उल्लेख करत आता काही वेळ मिळत नाही अशा शब्दांत खंतही व्यक्त केली.
असं म्हणतात की, लहान मुलांमध्ये वावरताना, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतानाही तुम्हाला त्यांच्यासारखंच व्हावं लागतं. अजित दादाही या क्षणी बालपणातच रमलेले दिसले.
राजकारणात असतानाही काही असे क्षण मिळतात जे दिवसभराचा क्षीण दूर करतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा व्हिडीओसुद्धा त्याचीच जाणिव करून देत आहे.