मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पुढे गेला आहे. राज्यात एका दिवसात कोरोनाचे १,१६५ नवे रुग्ण सापडले आहेत, तर २४ तासात ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २०,२२८ एवढी झाली आहे. तर राज्यात कोरोनामुळे ७७९ जणांना जीव गमवावा लागला आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक ७२२ रुग्ण वाढले आहेत, तर २७ जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला.
मुंबईमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२,८६४ एवढी आहे, तर आत्तापर्यंत मुंबईत ४८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या दिवसात कोरोनातुन बरे झाल्यामुळे ३३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आत्तापर्यंत एकूण ३,८०० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज झालेल्या ४८ मृत्यूंपैकी २७ मुंबईत, पुण्यात ९, मालेगावमध्ये ८, पुणे जिल्ह्यात १, अकोला शहरात १, नांदेड शहरात १ आणि अमरावती शहरात १ आहेत. मृत्यू झालेल्या ४८ जणांपैकी २१ महिला आणि २७ पुरुष आहेत. एकूम मृत्यू झालेल्यांपैकी २७ जण ६० वर्षांच्या पुढचे, १८ जण ४० ते ५९ या वयातले आणि ३ जण ४० वर्षांच्या खालचे आहेत.
मृत्यू झालेल्या ४८ जणांपैकी ९ जणांच्या आजारांबद्दल माहिती मिळालेली नाही. तर ३९ पैकी २८ जण (७२ टक्के) डायबिटीस, हायपर टेन्शन, हृदयाच्या आजाराने ग्रस्त होते.