नागपूर : अधिवेशनाच्या आजच्या म्हणजेच शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेऊन सरकार दिलासा देईल. राज्यातील शेतकऱ्यांसाठी चांगली सकारात्मक बातमी मिळेल, असा दावा करतानाच नवीन वर्ष सुरु होण्याआधीच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे संकेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलेत. त्याचवेळी उपमुख्यमंत्रीपदाबाबत त्यांनी मौन बाळगळे. पक्ष देईल, जी जबाबदारी देईल ती मी स्विकारणार आहे, हे आधीच स्पष्ट केले आहे, असे सांगत बोलण्यास नकार दिला.
१ जानेवारी २०२० पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शेतकऱ्यांबाबत चांगला सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच विदर्भाचा विचार करण्यात येत आहे. त्यामुळे थोडावेळ थांबा चांगला निर्णय होऊ शकतो, असे स्पष्ट केले. सिंचन घोटाळ्याबाबत जी क्लीन चिट मिळाली त्याबाबत नो कॉमेंट एवढीच प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवार आमचे उपमुख्यमंत्री असतील असे वक्तव्य केल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणालेत, कोणाला कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय पक्षाचे नेते शरद पवार घेतील. शरद पवार जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल. संजय राऊत काय म्हणाले ते मी वाचलेले नाही, असे सांगत अधिक भाष्य टाळले.