Maharashtra Assembly Winter Session 2023 Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये मागील 2 दिवसांपासून पोटावरुन टोलवाटोलवी सुरु आहे. अजित पवारांनी केलेल्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर अजित पवारांचं पोट सुटल्याचा फोटो पोस्ट केला. या फोटोसंदर्भात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया नोंदवली. अजित पवारांची प्रतिक्रिया ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसून अनावर झालं. अशातच आज या पोट प्रकरणावरुन अजित पवारांनी प्रसारमाध्यमांची फिरकी घेतली.
काही दिवसांपूर्वी कर्जत येथे पार पडलेल्या वैचारिक मंथन मेळाव्यात अजित पवारांनी सूचक पद्धतीने वरिष्ठ असा उल्लेख करत शरद पवारांच्या धोरणांसंदर्भात त्यांना असलेले आक्षेप भाषणामधून मांडले होते. याच भाषणामध्ये त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर खोचक शब्दांमध्ये टीका केली होती. जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी करण्यासाठी काही लोकांना घेऊन आंदोलन करण्याचे निर्देश देण्यात आले होते असा दावा अजित पवारांनी केला. याचवेळी बोलताना अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटाला उल्लेख करत मिश्कील टिका केली होती.
अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा एक फोटो शेअर केला. आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन आव्हाड यांनी अजित पवारांचा एका कार्यक्रमातील फोटो शेअर करत ढेरी वाढल्याचं दाखवलं. "दादा त्यादिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन 6 पॅक अॅब्स केले असतील पण हा परवाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो," असा टोला त्यांनी फोटो शेअर करत लगावला.
नक्की वाचा >> नवाब मलिकांचा अजितदादांना पाठिंबा! अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर; अजित पवार म्हणाले, "फोनवर..'
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी मिश्कील उत्तर दिलं. "आता पोट वाढलंय तर मी काय करु. वाढलं तर वाढलं, पण ते नुसतं वाढलं आहे त्यात महिना कोणता गेलेला नाही एवढं लक्षात ठेवा," असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांचं हे उत्तर ऐकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू आवरलं नाही.
अजित पवार आज हिवाळी अधिवेशाआधी प्रसारमाध्यमांशी विधानसभेच्या इमारतीबाहेर बोलत होते. त्यावेळी त्यांना अजित पवार गट आणि शरद पवार गटाला विधानसभेच्या अधिवेशनासाठी एकच कार्यालय देण्यात आलं आहे. याच पार्टी कार्यालयासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. अजित पवारांनी, "इतक्या छोट्या छोट्या प्रश्नांना महत्त्व देता आणि तेच चालवत बसता. काल तर मी बघितलं कोणीतरी माझं पोट दाखवलं, जितेंद्रचं पोट दाखवलं. अरे त्याने काय होणारं आहे? कोणाची पोटं दाखवून महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार आहेत का?" असा प्रतिप्रश्न विचारला. अजित पवारांचा प्रतिक्रिया ऐकून त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनाही हसू आलं. "महाराष्ट्रातील समस्या महत्त्वाच्या आहे. अवकाळी पाऊस पडतोय. पिकं उद्धवस्त होत आहेत. इथरही अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. आरक्षणासंदर्भातील प्रश्न निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होणं. त्यामधून मार्ग काढण्याला महत्त्व देणं आवश्यक असल्याचं मला वाटतं," असंही अजित पवार म्हणाले.