नवाब मलिकांचा अजितदादांना पाठिंबा! अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर; अजित पवार म्हणाले, "फोनवर..'

Maharashtra Assembly Winter Session 2023: अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी जामीन मिळाल्यानंतर आणि पक्षात फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच नवाब मलिक सहभागी होत आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 7, 2023, 12:03 PM IST
नवाब मलिकांचा अजितदादांना पाठिंबा! अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर; अजित पवार म्हणाले, "फोनवर..' title=
प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी मांडलं मत

Maharashtra Assembly Winter Session 2023: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी बुधवारीच नागपूरमध्ये दाखल झाले. काही आठवड्यांपूर्वीच जामीनावर बाहेर आलेले नवाब मलिक अधिवेशनात सहभागी होणार असल्याने ते अधिवेशनादरम्यान शरद पवार गटातील आमदारांबरोबर बसणार की अजित पवार गटाबरोबर बसणार यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. हाच प्रश्न विधीमंडळाबाहेर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. मात्र अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकांवर बसल्याचं दिसून आलं.

नवाब मलिक कुठं बसणार?

"आमदार नवाब मलिक आज आले आहेत. ते कुठल्या गटाबरोबर बसणार?" असा प्रश्न अजित पवारांना पत्रकारांनी विचारला. त्यावर अजित पवार यांनी, "तुम्हाला काय करायचं आहे? ते आमदार आहेत. स्वत:चा निर्णय घ्यायला ते खंबीर आहेत. आतमध्ये कोणी कुठे बसायचं याचा पूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. मधल्या काळात काय काय घडलं हे सगळं तुम्हाला ठाऊक आहे. सकाळी माझं आणि त्यांचं फोनवर बोलणं झालं. मी त्यांचं नागपूरमध्ये स्वागत आहे म्हणून फोन केला होता," असं उत्तर दिलं.

नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर

नवाब मलिक हे आज सकाळीच विधानभवनाच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर नवाब मलिक अनिल पाटील यांच्या कार्यालयामध्ये भेटीसाठी गेल्याचं दिसून आलं. अधिवेशन सुरु झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याचं दिसून आलं. त्यामुळे नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अनेक महत्त्वाचे प्रश्न

अजित पवार आणि शरद पवार गटाला विधानसभेच्या अधिवेशनासाठी एकच कार्यालय देण्यात आलं आहे. याच पार्टी कार्यालयासंदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवारांनी, "इतक्या छोट्या छोट्या प्रश्नांना महत्त्व देता आणि तेच चालवत बसता. काल तर मी बघितलं कोणीतरी माझं पोट दाखवलं, जितेंद्रचं पोट दाखवलं. अरे त्याने काय होणारं आहे? कोणाची पोटं दाखवून महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार आहेत का?" असा प्रतिप्रश्न विचारला. "महाराष्ट्रातील समस्या महत्त्वाच्या आहे. अवकाळी पाऊस पडतोय. पिकं उद्धवस्त होत आहेत. इथरही अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. आरक्षणासंदर्भातील प्रश्न निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होणं. त्यामधून मार्ग काढण्याला महत्त्व देणं आवश्यक असल्याचं मला वाटतं," असंही अजित पवार म्हणाले.

शेतकऱ्यांना मदत करण्याबद्दल विचारला प्रश्न

अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी, "मागच्याच कॅबिनेटला मुख्यमंत्रींनी जिथे नुकसान झालं आहे तिथे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. काल कॅबिनेटमध्ये देखील हा विषय चर्चेला आला. एनडीआरएफचे नियम काय आहेत. त्यापेक्षा अधिक कशी मदत करता येईल याची चर्चा झाली. याबद्दलची भूमिका मुख्यमंत्री मांडतील," असं उत्तर दिलं.

मराठा आरक्षणासंदर्भात काय म्हणाले अजित पवार?

"विरोधक ज्या विषयांची मागणी करतील त्यावर चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव याआधीच झाला आहे. एकदा हायकोर्टात आणि एकदा सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही. आता कोर्टासमोर आरक्षण टिकेल अशी समिती स्थापन करुन आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरु आहेत," असंही अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे.