सदा सरवणकर यांच्यावर दबाव, उद्धव ठाकरेंवर मानसिक दडपण; अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन कोंडी नेमकी कुणाची?

Sada Sarvankar : माहीममध्ये तिरंगी लढत होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. कारण, माघार घेण्यास सरवणकरांचा ठाम नकार आहे. मात्र, अमित ठाकरेंची उमेदवारीवरुन उद्धव ठाकरे देखील कोंडीत सापडले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Oct 28, 2024, 09:19 PM IST
सदा सरवणकर यांच्यावर दबाव, उद्धव ठाकरेंवर मानसिक दडपण; अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन कोंडी नेमकी कुणाची? title=

Maharashtra Assembly Elections 2024 :  सदा सरवणकर माहीममधून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.. मुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतरही सरवणकर माघार घेण्यास तयार नाही.. त्यामुळे अमित ठाकरेंच्या  उमेदवारीमुळे  महायुतीसह उद्धव ठाकरेंची कोंडी झाल्याचं बोललं जातंय. माहीम विधानसभेसाठी यंदा तिहेरी लढत होणार हे आता जवळपास निश्चित झालंय..   मनसेचे अमित ठाकरे,  अपक्ष म्हणून सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत असा सामना रंगणार आहे..

अमित ठाकरेंना महायुतीनं पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव भाजपनं दिलाय.  माहीम मतदारसंघातून माघार घेण्यास सदा सरवणकर यांनी ठाम नकार दिलाय.. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार असल्याची रोखठोक भूमिका त्यांनी जाहीर केलीय..

अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी त्यांना थेट मुख्यमंत्र्यांनी गळ घातली.. वर्षा निवासस्थानी बैठक घेऊन त्यांना मुख्यमंत्र्यांनी समजूतही काढली.जनतेसाठी निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय.. सदा सरवणकरांनी माघार घ्यावी यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला.. मात्र कोणत्याही दबावापुढे झुकणार नसल्याचं सरवणकर म्हणालेत... 

लोकसभेत मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता.. त्याची परतफेड अमित ठाकरेंना माहीममधून पाठिंबा देऊन करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे.. मात्र तसं होतांना दिसत नाहीये..  कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे लक्ष देणार नाही,  निवडणूक लढून जिंकणार असल्याचा विश्वास अमित ठाकरेंनी व्यक्त केलाय

सदा सरवणकर मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भऱणार आहेत.. यावेळी ते मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे.. अमित ठाकरेंसाठी माघार घेण्यासाठी सरवणकरांवर महायुतीतून दबाव वाढलाय. आदित्य ठाकरेंना 2019ला मनसेनं दिलेल्या पाठिंब्याची आठवणही मनसैनिक उद्धव ठाकरेंना करुन देण्याची शक्यता आहे. त्यामुळं नाही म्हटलं तरी उद्धव ठाकरेंवरही माहीमच्या जागेवरुन मानसिक दडपण असणार आहे.