Maharashtra Assembly Election: "पंतप्रधान मोदी त्यांच्या सरकारी लवाजम्यासह सध्या महाराष्ट्रातील प्रचार कार्यात गुंतले आहेत. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने एक तर प्रचारात फार अडकू नये. पंतप्रधान हे एखाद्या पक्षाचे नसतात. विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांच्या प्रचारातही अलीकडे आपले पंतप्रधान वारंवार दिसत आहेत. त्यामुळे पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, नरसिंह राव यांच्यासारख्या नेत्यांनी पंतप्रधान पदास जी उंची गाठून दिली ती खाली आली," असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लागवला आहे. तसेच पुढे बोलताना, "पुन्हा पंतप्रधानांनी अशा प्रचार सभेत करावयाच्या भाषणांबाबतही काही संकेत आहेत. पंतप्रधानांनी संयमाने बोलावे अशी परंपरा आहे, पण भाजपचे पंतप्रधान मोदी यांनी सर्व संकेत, पदाची प्रतिष्ठा खालच्या पातळीवर आणली," असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाने पंतप्रधानांच्या भाषणांवर आक्षेप घेतला आहे.
"‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’, ‘देशद्रोही’ वगैरे विषय राज्याच्या निवडणुकीत त्यांनी आणले आहेत. ‘काही देशद्रोही घटक त्यांच्या स्वार्थापोटी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकांनी त्यांचा पराभव करावा’, असे मोदी यांनी जाहीरपणे सांगितले. महाराष्ट्रातील सभेतून ते अशी मुक्ताफळे उधळतात तेव्हा आश्चर्य वाटते. अधूनमधून ते हिंदुत्वाची पुडी सोडतात. लवकरच ट्रम्प, युक्रेन युद्धाचाही प्रवेश त्यांच्या प्रचारसभेत होईल. कश्मीर, 370 कलम याबाबत काँग्रेसकडून कसा विरोध झाला याबाबत पंतप्रधानांची भाषणे सुरू आहेत. चिमूरच्या सभेत गर्दीतला भगवा रंग पाहून त्यांनी ‘भगवी गर्दी’ असे जाहीर केले. महाराष्ट्राची निवडणूक म्हणजे ‘धर्मयुद्ध’ असल्याचे वक्तव्य भाजपच्या काही लोकांनी केले व पंतप्रधान मोदीही निवडणुकीची धर्मध्वजा घेऊनच प्रचारात उतरले आहेत. मोदी हे भान सुटल्याप्रमाणे बोलतात व त्यांचे भक्त टाळ्या वाजवून फेकुगिरीस प्रोत्साहन देतात असे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे," असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
"महाराष्ट्रात भ्रष्टाचार, देशद्राsह वगैरेंचा मुद्दा पंतप्रधानांनी आणला, पण मोदी यांनी हे भ्रष्टाचारी व देशद्रोही कोण याबाबत खुलासा का करू नये? इतर पक्षांतले सर्व भ्रष्टाचारी ईडी, सीबीआयचे आरोपी, मनी लाँडरिंगवाले हे भाजपात सामील झाले आहेत. इक्बाल मिर्ची, दाऊद इब्राहिमबरोबर आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना मोदी व त्यांच्या महान पक्षाने आपल्या पंखाखाली घेतले आहे. संविधान, कायदा, न्यायालये आपल्या स्वार्थासाठी हवी तशी मोडून ठेवली. देश एखाद्या व्यापाऱ्यासारखा चालवून मोदी यांनी सर्व सार्वजनिक संपत्ती आपल्या एकाच उद्योगपती मित्राच्या हवाली केली. हे काय देशभक्तीचे लक्षण झाले?" असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने उपस्थित केला आहे. "‘बटेंगे तो कटेंगे’ अशा गर्जना करणे सत्ताधारी पक्ष व त्यांच्या नेत्यांना शोभत नाही. आपण एकाच राज्याचे व एकाच धर्माचे पंतप्रधान आहोत अशा आवेशात मोदी वागत असतील तर ते बरे नाही. महाराष्ट्रासारखे एकेकाळचे बलवान राज्य त्यांनी कमजोर करून ठेवले व पिचक्या पाठकण्याचे लोक त्यासाठी सत्तेवर आणले. हा एक प्रकारे महाराष्ट्रद्रोहच आहे. धार्मिक ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकण्यावर मोदी यांचा भर आहे व त्यासाठीच ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ची घोषणा ते देतात. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने संयम व भान गमावले की त्यांचा मोदी होतो व अशा मोदींना पंडित नेहरू, इंदिरा गांधी, नरसिंह राव, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांच्याविषयी असुया निर्माण होते," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
"निवडणूक प्रचारातील मनमोहन सिंग यांच्या भाषणांचा अभ्यास मोदी यांनी केला पाहिजे. पंडित नेहरू वगैरे तर त्यांच्या कल्पनेपलीकडचे आहेत. मोदी ज्या पद्धतीने निवडणूक प्रचारात भाषणे ठोकत असतात त्यावरून खऱ्याची दुनिया राहिलेली नाही हे पटायला लागले आहे. समाजाचे विभाजन करण्याची भाषा पंतप्रधानांकडून होत असेल तर भारताचा निवडणूक आयोग चिरुट फुंकत धुराची वलये सोडीत बसला आहे काय? 370 कलमाचा विषय महाराष्ट्राच्या व झारखंडच्या निवडणुकीत आणायचे कारण नाही. 370 कलम हा आता त्या राज्याचा विषय आहे. शिवसेनेने तर 370 कलम हटवताना संसदेत विरोध केला नाही. तरीही मोदी महाराष्ट्रात 370 कलमाचा बुलबुलतरंग वाजवीत आहेत. कारण त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत. महाराष्ट्रात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला तो मोदींच्या धोरणांमुळे. महाराष्ट्रातील अनेक मोठे उद्योग गुजरातला पळवून मोदी यांनी मराठी तरुणांच्या पोटावर लाथ मारली. 370 कलम, ‘बटेंगे, कटेंगे’पेक्षा आमचे उद्योग गुजरातला का पळवले? आमच्या पोरांना बेरोजगार का ठेवले? या प्रश्नांची उत्तरे मोदी यांनी महाराष्ट्राला द्यावीत, पण मोदी हे भलतेच विषय घेऊन बोलत आहेत. यालाच बनवाबनवी म्हणतात," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.